नांदेड - गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांची एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन श्रमदान, जलसंधारण आणि विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्यास प्रशासनही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहील. लोकसहभागाच्या बळावर नांदेड जिल्ह्यातील गावे विकासाची आदर्श मॉडेल बनविण्याची क्षमता आपल्यात आहे. भविष्यात इतर जिल्ह्यांतील लोकांनीही ग्रामविकासाची कामे पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यात यावे, असे चित्र निर्माण करूया, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले.
भोकर तालुक्यातील कामनगाव येथे सेवा समर्पण परिवार व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय दुसऱ्या पाणी सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, उमरी बाजार समितीचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर, बाळासाहेब रावणगावकर, सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, उद्योजक सर्जेराव ढगे, महंत उत्तमबन महाराज, महंत चिंतामणी महाराज, सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष दिगंबर देशमुख, विठ्ठल फुलारी आदी उपस्थित होते.
गावात विकासाची इच्छा आणि ग्रामस्थांची एकजूट असेल, तर प्रशासनालाही काम करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. शेंबोली, येरगी, पिंपळगाव आणि कामनगाव यासारख्या गावांमध्ये ग्रामस्थांनी दाखविलेला उत्साह, श्रमदानाची भावना आणि विकासासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. अशा गावांच्या प्रयत्नांतून इतर गावांनाही प्रेरणा मिळू शकते, असे सीईओ पाटील यांनी सांगितले.
गावाच्या समृद्धीसाठी पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. जलसंधारणाची कामे करताना पारंपरिक पद्धतींबरोबरच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे पाणलोट नकाशे, कंटूर मॅपिंग आणि उपलब्ध तांत्रिक माहितीचा उपयोग करावा. जमिनीचा प्रकार, मातीची खोली आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने जल व मृदसंधारणाची कामे हाती घ्यावीत. कमी पावसाच्या प्रदेशातही योग्य नियोजनातून पाणी व्यवस्थापन यशस्वी करता येते, हे राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार यासारख्या गावांनी दाखवून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.
महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून व्यवसायाभिमुख उपक्रमांना चालना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महिलांना त्यांच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे व उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करणे यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषद व तालुका स्तरावर महिला बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असून, दर दोन ते तीन महिन्यांनी विक्री प्रदर्शनांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे यापेक्षा श्रमदानाच्या माध्यमातून गावातील सर्व घटकांनी एकत्र येणे अधिक महत्त्वाचे आहे. जलयुक्त शिवार अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि वॉटर कप यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गावांनी विकासाच्या संधी साधाव्यात. यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी गावात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून विविध उपक्रमांची माहिती घेतली.
दरम्यान सेवा समर्पण परिवार व कामनगाव ग्रामस्थांच्या वतीने १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यान पाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या कालावधीत दररोज श्रमदान, व्याख्याने, कीर्तन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जलतारा, सीसीटी, खोदकाम, माती नालाबांध, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता आणि दगडी बांध यांसारखी जल व मृदसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन राघोबा पाटील सोळंके यांनी केले, तर आभार सेवा समर्पण परिवाराचे सचिव विठ्ठल फुलारी यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, तालुक्यातील विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
*हरिनाम सप्ताहापेक्षा पाणी सप्ताह ही काळाची गरज*
*-आ. हेमंत पाटील*
आजच्या काळात हरिनाम सप्ताहापेक्षाही पाणी सप्ताहाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पाणी सप्ताहाचे आयोजन करून ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्रमदान करावे आणि पाण्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार हेमंत पाटील यांनी केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतविचारांचा प्रभाव आजही समाजमनावर आहे. त्यामुळे गावागावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. मात्र, संतांनी दिलेल्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणे आवश्यक आहे. केवळ धार्मिक आयोजनापुरते मर्यादित न राहता संतविचारांचा सामाजिक परिवर्तनासाठी उपयोग झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
पाणी सप्ताहाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपले गाव पाणीदार कसे होईल, याचा विचार करावा. माती नालाबांध, वनराई बंधारे, साखळी सिमेंट बंधारे, जलतारा यासारखी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून राबवावीत. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविल्यास भूजल पातळीत वाढ होऊन गावे पाणीदार होतील. यासाठी प्रत्येक गावाने सामूहिक श्रमदानाचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.