आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि. - कराड येथे २४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी प्रदर्शनाचे अध्यक्ष, कृषी विभागाच्या आत्मा चे प्रकल्प संचालक अजय शेंडे, तालुका कृषी अधिकारी आणि सहभागी होणाऱ्या विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची उत्पादनवाढ व्हावी यासाठी चारा निर्मिती, शेतीमाल प्रक्रिया आणि सोयाबीन मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीचे स्टॉल उभारावेत. तसेच, चांगल्या उसासह विविध शेतीमाल उत्पादनांच्या स्पर्धांचे आयोजन करावे. प्रदर्शनात शेतकरी प्रोत्साहन योजनांची माहिती देणारे स्टॉल, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान व सिंचन, धान्य महोत्सव आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल असावेत. यासोबतच ॲग्रीस्टॅक, ई-केवायसी आणि अग्रणी बँकांचे स्टॉलही लावण्यात यावेत. संपूर्ण प्रदर्शन परिसरात स्वच्छता राखण्यावर विशेष भर द्यावा. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या महिला शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी स्वच्छ आणि उत्तम शौचालयांची व्यवस्था करावी.