भगूरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन; भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचा उपक्रम

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 17/11/2026 4:15 AM

भगूरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन; भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचा उपक्रम

​भगूर (प्रतिनिधी) :

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या' वतीने भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​भगूर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे ऐतिहासिक ऋणानुबंध

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला आणि भगूर शहराशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा देण्यात आला. १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर तरुणांची फळी उभी केली. सुरुवातीच्या काळात मुंबई आणि ठाणे येथेच शिवसेनेच्या शाखा कार्यरत होत्या. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरबद्दल बाळासाहेबांना असलेला विशेष आदर आणि स्थानिक तरुणांची संघटन कौशल्ये यामुळे २२ ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेची तिसरी शाखा भगूरमध्ये स्थापन झाली.

​त्यानंतर भगूर येथे बाळासाहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. या संकल्पाची पूर्तता करत २३ जानेवारी १९७० रोजी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक घटनांमुळे भगूर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एक अतूट नाते निर्माण झाले आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

स्मृतिदिनानिमित्त आयोजित या अभिवादन सोहळ्यास उपनगराध्यक्ष प्रसाद आडके यांच्यासह नगरसेवक दिपक बलकवडे, मृत्युंजय कापसे, मनोज कुवर, योगेश बुरके, सुनिल जोरे, प्रशांत लोया, प्रताप गायकवाड, संदीप शेटे, विशाल शिरसाठ, निलेश हासे, प्रविण वाघ, सौरभ कुलकर्णी, राजेंद्र ओहोळ यांच्यासह भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या