स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत कचऱ्याचे साम्राज्य; अनधिकृत कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याची ज्येष्ठ नागरिकांची मागणी
भगूर (प्रतिनिधी) :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर गावालगतच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला (उजव्या व डाव्या भागात) मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार विरोध होऊनही या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने अखेर विजयनगर, भगूर येथील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.
परिसरातील काही हॉटेल, हॉस्पिटल, चायनीज गाडे, मांस-मच्छी विक्रेते आणि काही बेशिस्त नागरिकांकडून या ठिकाणी सडलेला कचरा तसेच मृत जनावरे आणून टाकली जात आहेत. वारंवार सूचना आणि विरोध करूनही हा प्रकार राजरोसपणे सुरूच आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड व भगूर नगरपरिषदेकडे कचऱ्याच्या छायाचित्रांसह अनेकदा तक्रारी केल्या होत्या; मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
प्रशासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून अखेर ज्येष्ठ नागरिकांनी 'अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती'च्या जिल्हाध्यक्षांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत समितीचे पदाधिकारी व नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली आणि नव्याने तयार होत असलेल्या या अनधिकृत कचरा डेपोवर तीव्र आक्षेप नोंदवला.
समिती व नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
या पाहणीनंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि भगूर नगरपरिषद या दोन्ही प्रशासनांना खालील उपाययोजना तातडीने राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
उच्च प्रशासनाची परवानगी घेऊन या परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचना फलक (बोर्ड) लावावेत.
सुरुवातीच्या काळात कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रतिनिधी किंवा कर्मचारी नियुक्त करावेत.
साचलेल्या घाणीमुळे पसरणाऱ्या संभाव्य रोगराईवर तातडीने अंकुश आणावा.
या पाहणी व आक्षेप नोंदवण्याच्या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत, शिवसेना नेते कैलास गायकवाड, सेवानिवृत्त नामदेव कस्तुरे सर, संजय बलकवडे, जगन पवार, बलराम वाघमारे, उद्योजक नंदूजी लाहोटी, किशोर भवार, बाळासाहेब साळवे, सतिश भगत, अशोक सदावर्ते, श्यामआप्पा डावरे, विशाल पवार, विजय गांगुर्डे आणि अनिल कटारे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता तरी प्रशासन जागे होऊन सावरकरांच्या पावन भूमीला या कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.