कुपवाडमध्ये उद्यापासून नऊ दिवस भव्य सिध्दचक्र महामंडल विधान महामहोत्सव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/11/2026 2:12 AM


*२४ सिद्धशिलांसहित सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायागाचे आयोजन*

कुपवाड : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल) यांच्या वतीने २४ सिद्धशिलांसहित भव्य श्री सिद्धोत्सव आराधना व विश्वशांती महायाग महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर ते बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नऊ दिवस विविध धार्मिक विधी, अभिषेक, पूजन, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा होणार आहे.

आगम चक्रवर्ती आचार्य विद्यासागरजी महाराज व सकल मुनी संघस्थ महाराज यांच्या पावन मंगल सान्निध्यात, जगदगुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, संस्थान मठ नांदणी यांच्या अधिनेतृत्वाखाली तसेच परमपूज्य जगदगुरू स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, संस्थान कोल्हापूर यांच्या पावन उपस्थितीत हा धार्मिक महोत्सव संपन्न होणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ १७ नोव्हेंबर रोजी नांदीमंगल, इंद्र यजमान प्रतिष्ठा, राजा श्रीपाल व मैनासुंदरी यांच्या मंगल आगमनाने होणार आहे. यानंतर सिद्धचक्र विधानाचा प्रारंभ, अर्घ्य, पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक, चक्रवर्तींद्वारे विशेष पूजा आणि जिनमंदिरामध्ये यागमंडल विधान असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

दि. १८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी राजा श्रीपाल व मैनासुंदरी यांचे मंगल आगमन, जलकुंभ मिरवणूक, श्री सिद्धचक्र विधानाचे अर्घ्य, पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक व विशेष पूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी मंगल प्रवचन, धनपतीद्वारे रत्नवृष्टी, होम-हवन, सायंकाळी जिनशास्त्र व धर्मध्वजा मिरवणूक, तसेच रात्री जाप, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणून शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सात वर्षांखालील मुला-मुलींसाठी सरस्वती संस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मौंजीबंधन संस्कार, तसेच दुपारी २ वाजता 'माझे माहेर, माझा स्वाभिमान, माझा अभिमान' हा विशेष कार्यक्रम होणार आहे. सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भव्य श्री विहार रथोत्सवाचे सवाल घेण्यात येणार आहेत.

बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचा मुख्य धार्मिक सोहळा होणार आहे. सकाळी ७ वाजता राजा श्रीपाल व मैनासुंदरी यांचे मंगल आगमन व जलकुंभ मिरवणूक, सकाळी ८ वाजता श्री सिद्धचक्र विधानाचे पूजन, १०८ कलशांनी अभिषेक स्नान, महाभिषेक आणि विश्वशांती महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता मंगल प्रवचन, धनपती द्वारे रत्नवृष्टी, आचार्य श्रीं ची संघपूजा व सत्कार समारंभ होणार आहे. सायंकाळी धर्मध्वजा मिरवणूक आणि रात्री ७ वाजता भव्य श्री विहार रथोत्सवाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यात प्रथमच सिद्धचक्र विधान भव्य दिव्य प्रमाणात संपन्न होणार आहे. जैन समाज बांधवांच्या सहभागातून हा मंगलमय धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक संस्कार, जिनवाणीचा प्रसार आणि समाजातील धार्मिक एकात्मतेला विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. 

विधानाचे प्रतिष्ठाचार्य म्हणून संदेश उपाध्ये हे काम पाहणार आहेत तर सहप्रतिष्ठाचार्य म्हणून ऋषभ उपाध्ये ,भरत उपाध्ये व विधानआचार्य म्हणून मेघकुमार उपाध्ये, शितल उपाध्ये यांच्यासह स्थानिक पंडित वर्धमान उपाध्ये, श्रेयांश उपाध्ये व प्रकाश उपाध्ये हे काम पाहणार आहेत.तर संगीतकार म्हणून सचिन चौगुले साथ देणार आहेत. 
     या  सिद्धचक्र महामंडल विधान महोत्सवाचे सयोंजन कुपवाड मधील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल),  श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर,  दिगंबर जैन सेवा समिती, सुधर्मसागर मुनी महाराज प्रतिष्ठान, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, व समस्त दिगंबर जैन समाज, तसेच कुपवाडमधील विविध सर्वधर्मीय सामाजिक, धार्मिक, सहकारी संस्था व मंडळांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

या मंगलमय धार्मिक महोत्सवात सर्व श्रावक-श्राविका, जैन समाज बांधव आणि धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध धार्मिक विधी, प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिगंबर लाल जैन मंदिराचे विश्वस्त,आयोजक व संयोजक यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या