नांदेड :- भाग्यनगर परिसरातील जेठेवाड कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू झालेल्या श्री गुरु महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या शाखेला शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली तसेच महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
श्री गुरु महिला अर्बन पतसंस्थेच्या नव्या शाखेचे उद्घाटन दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी युवा संत राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. भाग्यनगर येथील जेठेवाड कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेल्या या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी अर्बनच्या चेअरमन राजश्री ताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्री मन्मथ माळगे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्यामध्ये बचतीची सवय निर्माण करणे, तसेच ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास कुटुंबासह समाजाच्या आर्थिक प्रगतीलाही हातभार लागतो, या विचारातून संस्थेची वाटचाल सुरू आहे.दरम्यान १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी इंजिनिअर अनिल माळगे, पोलीस पाटील शिवकुमार शिवशेट्टे, कर्मचारी नितीन अभंगे आणि सोसायटीचे कार्याध्यक्ष मन्मथ माळगे यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
महिलांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात उभा राहत असलेला हा आर्थिक उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असून,नव्या शाखेच्या माध्यमातून नांदेड शहरातील ग्राहकांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.