पत्रकार रवीकुमार शिंदे यांचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सचिवालयातील अधिकाऱ्यांचे मानले आभार
अहिल्यानगर : दुष्काळी भागातील रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, फळबाग आणि इतर वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये मजुरांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ऑनलाइन हजेरीपत्रकासोबत ऑफलाइन हजेरीपत्रकाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रवीकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे ई-मेलद्वारे केली होती.
या मागणीची मुख्यमंत्री सचिवालयाने दखल घेतली आहे. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे प्रतिसाद देताना संबंधित निवेदन योग्य त्या कार्यवाहीसाठी रोजगार हमी योजना विभागाकडे पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित विभागाकडे चौकशी करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी आणि वैयक्तिक लाभाच्या कामांचे लाभार्थी ऑनलाइन हजेरी प्रक्रियेमुळे विविध तांत्रिक अडचणींचा सामना करत आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या तसेच इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे ऑनलाइन हजेरीसोबत ऑफलाइन हजेरीपत्रकाचा पर्याय उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील मजूर आणि लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन आपले निवेदन संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी आणि संबंधित प्रशासनाचे पत्रकार रवीकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
मात्र, निवेदन विभागाकडे पाठविण्यापुरतीच कार्यवाही मर्यादित न राहता रोजगार हमी योजना विभागाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि दुष्काळी भागातील मजूर, शेतकरी व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष दिलासा द्यावा, अशी अपेक्षा रवीकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
— रवीकुमार शिंदे
मुख्य संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार परिषद – महाराष्ट्र राज्य सचिव
माहिती अधिकार कार्यकर्ता
#मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस #रोजगारहमी योजना #मनरेगा #ऑफलाइनहजेरीपत्रक #अहिल्यानगर #दुष्काळग्रस्त #मजूरप्रश्न #रवीकुमारशिंदे #आपलंसत्यअहिल्यानगर #महाराष्ट्रशासन