पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नवा आश्वासक पायंडा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/04/2025 9:56 AM


स्नेहभोजनातून शासकीय यंत्रणांच्या पाठीवर कौतुकाची थाप

सांगली, दि. 8,
जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यात सांगलीकर म्हणून योगदान द्या, राज्यात जिल्हा अव्वल ठरेल यासाठी प्रयत्न करा, असा वडीलकीचा प्रेमळ सल्ला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय यंत्रणाप्रमुखांना दिला. निमित्त होतं जिल्हा नियोजन समितीचा निधी 100 टक्के खर्च झाल्याबद्दल प्रमुख यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या स्नेहभोजनाचं. यानिमित्त एक चांगली आश्वासक सुरुवात होऊन आगामी काळात पालकमंत्र्यांच्या विश्वासाचं रूपांतर यशात होण्यास पाठबळ मिळाले आहे. 
जिल्हा नियोजन समितीचा जवळपास 100 टक्के निधी खर्च झाल्यानंतर प्रमुख कार्यान्वयन यंत्रणाच्या अधिकाऱ्यांना आपण एक स्नेहभोजन देऊ, असे फेब्रुवारी महिन्यातील एका बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषित केले होते. हा शब्द पाळत त्यांनी आमराई ऑफिसर्स क्लब येथे दिलेल्या या स्नेहभोजनाने सर्व अधिकाऱ्यांना एक वेगळीच प्रेरणा मिळाल्याचे दिसून आली. आपण काम केले तर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप नक्कीच पडते, हा विश्वास यातून शासकीय यंत्रणांना मिळाला. 
जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्यासह जवळपास 50 यंत्रणांच्या प्रमुखांसाठी पालकमंत्री यांनी स्वखर्चातून हे स्नेहभोजन आयोजित केले होते. शिवाय प्रत्येकासाठी एक विशेष भेटवस्तूही. नेहमीच्या बैठकीतही ते चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कॅडबरी भेट देऊन प्रोत्साहन देतात.
मंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जिल्ह्याचे पालकत्त्व खऱ्या अर्थाने निभावताना दिसत आहेत. पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते सतत ॲक्शन मोडवर आहेत. खरं तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्हा नियोजन समितीचा केवळ 52% निधी खर्च झाला होता. त्यावेळी निधी खर्चण्यात राज्य क्रमवारीत जिल्ह्याचा 22 वा क्रमांक होता. अनेक महत्त्वाच्या विकासकामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी, निधी वितरण व निधी विहित वेळेत खर्च पडणे यासाठी केवळ महिना – दीड महिनाच शिल्लक होता. याचे गांभीर्य लक्षात घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीचा वेळोवळी आढावा घेत जिल्हा नियोजन समितीचा निधी 31 मार्चअखेरीस खर्च पडेल, यासाठी वेळोवेळी आढावा घेतला. 
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील व त्यांची टीम तसेच, सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी वेळीच दक्षता घेत त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी साथ दिली. परिणामी आर्थिक वर्षाखेरीस सांगली जिल्हा नियोजन समितीचा 99.6 टक्के निधी खर्च पडला. केवळ संकेतस्थळाची गती धीमी असल्याने उर्वरित 0.40 टक्के निधी खर्च होऊ शकला नाही. यावर्षी जवळपास संपूर्ण निधी खर्च पडल्याने पुढील वर्षी मिळणाऱ्या निधीत कपात होणार नाही.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना कामाशी बांधिलकी व नागरिकांशी संवेदनशीलतेने वागण्याचा सल्ला दिला. नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करावा, दिरंगाई न करता वेळीच सामान्य नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे एप्रिल-मे मध्येच अंदाजपत्रक तयार करावे. पावसाळी हंगामात मान्यतांची कार्यवाही व डिसेंबरपर्यंत निधीचा विनियोग निश्चित करण्याचे उद्दिष्ट यंत्रणांनी ठेवावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्व यंत्रणांनी टीम वर्क म्हणून काम केल्यास नागरिकांमध्ये शासन व प्रशासनाबद्दल एक सकारात्मक प्रतिमा निर्माण होईल, असे सांगताना त्यांनी अनेक दाखले दिले. सांगली जिल्ह्यातही टीम वर्कने काम होण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन दर महिन्याला निवडक यंत्रणांशी अनौपचारिक स्नेहभोजन करू. त्यातून प्रशासकीय स्तरावर अडकलेल्या फाईलीतील तांत्रिक अडचणी दूर होऊन कामांना गती येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील व पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांनीही स्नेहभोजनाचा हा सोहळा प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष लक्ष दिले. अगदी उपस्थित प्रत्येक जणाचे उदरभरण होईल, याची त्यांनी जातीने चौकशी केली.
पालकमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्याचा प्रत्येक कार्यालय प्रमुखाने संकल्प करून जिल्ह्याचा चौफेर व शाश्वत विकासास हातभार लावण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल जिल्ह्याला अग्रेसर करणारे ठरेल, हीच अपेक्षा.

Share

Other News

ताज्या बातम्या