सांगली प्रतिनिधी,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साधारणपणे मे महिन्यात नालेसफाई, ड्रेनेज सफाई केली जाते. महानगरपालिका क्षेत्रात अंडरग्राउंड ड्रेनेजसह मोठमोठ्या गटारी ही आहेत. या गटारांमध्ये वर्षभरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकला जातो. यामुळे सदरची गटारे तुंबून जातात. आणि पावसाळ्यात हे दूषित पाणी रस्त्यावर येऊ नये,व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी नालेसफाई करण्याचे काम महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर हाती घ्यावे. अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे .
महानगरपालिका क्षेत्रातील अनेक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असून, परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. शिवाय हे नाले तुंबल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी शहरातील अनेक भागात तळी साचतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
सांगली शहरात दर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते याला दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातून अथवा शहराजवळून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे होऊन मोठ्या प्रमाणावर बांधकामे केली आहेत. या अतिक्रमणांवरही लक्ष घालून ती अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वी ताबडतोब काढावीत आणि पाण्याला वाट मोकळी करून द्यावी. अशी मागणीही मनोज भिसे यांनी केली आहे .
येत्या काही दिवसात याबाबत पावले न उचलल्यास महापालिका कार्यालयासमोर नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .
कळावे
मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच