अलमट्टीप्रश्नी केंद्रसरकारने मध्यस्थी करत तोडगा काढावा : खासदार विशाल पाटील

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/04/2025 9:46 PM

कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सध्या या धरणाची ऊंची ५१९ मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची ५२४ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात कामगार भवन सांगली येथे विरोधी बैठक पार पडली. 
अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराचं संकट येऊन हजारो कोटींचं नुकसान अलिकडच्या काळात नेहमीच होत आहे. 2005, 2019 आणि 2021 या वर्षी आलेल्या महापुराच्या संदर्भात वडनेरे समितीच्या अहवालात कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचं स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच 2017, 2019 व 2022 मध्ये आलेल्या महापुरात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीसह अनेक लहान-मोठी नदीकाठची गावे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक लोकांना, जनावरांना जलसमाधी मिळाली होती. शेती, विद्युत पंपांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. याचे प्रमुख कारण अलमट्टी धरणाच्या पाण्याची (बॅक वॉटरची) फूग हे होते. आता अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवली, तर कल्पनाही करता येणार नाही, एवढे नुकसान होणार आहे. त्यामुळे आमचा याला विरोध आहे. आणि अलमट्टी धरणाच्या ऊंचीबाबत केंद्र सरकारने मध्यस्थी करत यावर तोडगा काढण्यास मदत करावी.
यावेळी बैठकीस पदवीधर आमदार अरुणअण्णा लाड, आमदार रोहित पाटील इतर लोकप्रतिनिधी, इरिगेशन फेडरेशनचे प्रतिनिधी, शेतकरी व सांगलीतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या