सांगली प्रतिनिधी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले असता, तिथल्या डॉक्टरांनी 20 लाख रुपये भरण्याची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून न घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने,तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जात असून मिरजेसह सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खाजगी हॉस्पिटल आपली सेवा देत आहेत. परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यातील या हॉस्पिटल कडून घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा अशा हॉस्पिटल्सना आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे .