अचलपूर : अचलपूर मतदार संघातील अतिशय अनुभवी राजकारण्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चुभाऊ कडू व महाविकास आघाडीचे बबलूभाऊ देशमुख दोघांचे नाव प्रसिद्धीस आहे. दोघांमध्येच अचलपूर मतदार संघात काटेरी लढत असेल यामध्ये दुमत नाही. दोन्ही नेते अतिशय प्रगल्भ राजकारणी व दांडगा राजकारणातील अनुभव घेऊन या मैदानात उतरलेले आहे.
ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली. महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.
बबलू देशमुख बद्दल राजकीय प्रवास पाहता अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांना अमरावतीतच नव्हे तर पूर्ण विदर्भात ओळखतात. बबलू भाऊंचे वर्चस्व महाविद्यालयीन जीवनापासूनच छात्र संघ निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक, सेवा सहकारी संस्था निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, अमरावती जिल्हा को-ऑपरेटिव बँक निवडणूक यामध्ये बबलू भाऊंचा दबदबा पाहायला मिळतो. बबलू भाऊंनी जिल्ह्याच्या विकासाकरिता, विभिन्न सामाजिक समस्या मध्ये कामे केलेली आहेत गत दहा वर्षापासून बबलू भाऊ देशमुख जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत व जेव्हापासून त्यांनी हा पदभार सांभाळला तेव्हापासून अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले. अनुभवच्या अथक प्रयत्नांमुळे अमरावती जिल्ह्याचे खासदार बलवंत भाऊ वानखडे हे सुद्धा निवडून आणण्यामध्ये बबलू भाऊंचे नेतृत्व व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती ही महत्त्वाची आहे. अशा दोन्ही बलशाली नेत्यांचे भवितव्य अचलपूर मतदारांच्या हाती आहे हे विशेष. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी या द्वारे मतदाराअन्वये दोन्ही नेत्यांचा राजकीय प्रवास ठरणार आहे.