दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी सर्व विभागांनी समन्वयातून जबाबदारी पार पाडावी -- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश;पाणीटंचाई, सिंचन व चारा नियोजनाचा सविस्तर आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/11/2026 9:23 AM

नांदेड : दुष्काळ व पाणीटंचाईच्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून कामे करावीत. नागरिकांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन तसेच पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. मंजूर उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे पानी फाऊंडेशनद्वारे आयोजित 'संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप 2027’चा शुभारंभ केला. या शुभारंभ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी करण्यात आले.

बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, सिंचन व्यवस्था, उपलब्ध जलसाठा, उन्हाळी हंगामातील पाणी नियोजन तसेच पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता या विषयांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा आज घेण्यात आला.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा, कृषी, महावितरण, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगर विकास यासह संबंधित विभागाचे विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश*
बैठकीत जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. जमिनीतील उपलब्ध पाणीपातळी, विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. वाढती पाण्याची मागणी, सिंचन क्षेत्रात होणारी वाढ, लाभक्षेत्राबाहेरील गावांची पिण्याच्या पाण्याची गरज तसेच नदी-नाल्यांमध्ये पाणी सोडण्याच्या नियोजनाचा विचार करण्यात आला. उन्हाळी हंगामातील प्रस्तावित पाणीपाळ्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

*पाणीटंचाई निवारणासाठी तालुकानिहाय नियोजन*
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. टँकरद्वारे पाणीपुरवठा, विंधन विहिरी, नळ पाणीपुरवठा योजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरी, विहिरींचे खोलीकरण आणि गाळ काढणे आदी उपाययोजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विशेषतः अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये टंचाईच्या काळात नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या.

*नियमबाह्य बोअरवेल खोदल्यास कठोर कारवाई*
जमिनीतील पाणीपातळी खालावत असताना नियमबाह्य पद्धतीने २०० फुटांपेक्षा अधिक खोल विहिरी किंवा बोअरवेल खोदण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करून बोअरवेल खोदण्यात येत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर धडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

*जलतारा कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश*
जिल्ह्यात सुरू असलेल्या जलतारा कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. ही कामे प्रत्यक्ष क्षेत्रावर वेळेत पूर्ण करून निर्धारित उद्दिष्ट साध्य करावे. कामे पूर्ण करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून निराकरण करावे, असे निर्देश देण्यात आले. आवश्यक त्या तांत्रिक बाबींवर बैठकीत मार्गदर्शनही करण्यात आले.

*पशुधनाच्या चारा उपलब्धतेसाठी आतापासूनच नियोजन*
भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पशुधनाच्या चारा टंचाईचा विचार करून चारा पिकांची लागवड, चाऱ्याची मागणी आणि उपलब्ध साठा याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. शेतकरी आणि नागरिकांशी चर्चा करून चारा उपलब्धतेचे योग्य नियोजन करावे. तसेच भविष्यात चारा टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना आतापासूनच हाती घ्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.

*जलसाठे आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानाचा आढावा*
जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन विविध जलप्रकल्प, नद्या, तलाव, कालवे आणि बंधारे यामधील उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती तपासण्यात आली. तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि सर्व विभागांमधील समन्वय यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या