इसापूर धरण कळमनुरी तालुक्याच्या सीमेवर असले, तरी या धरणाचा प्रत्यक्ष लाभ कळमनुरी तालुका आणि हिंगोली जिल्ह्यातील केवळ दहा ते वीस गावांनाच मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, याच धरणाचे पाणी तेलंगणाच्या टोकापर्यंत पोहोचत असताना धरणाच्या परिसरातील रेडगाव, वडगाव आणि वंजारी डिग्रससह भाटेगाव वितरिकेवरील गावांतील शेतकऱ्यांना मात्र आपल्या हक्काच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. धरणासाठी आपल्या सोन्यासारख्या जमिनी दिल्यानंतरही पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
इसापूर धरणाचे पाणी आपल्या शेतापर्यंत पोहोचेल आणि दुष्काळी किंवा अडचणीच्या काळात शेतीला आधार मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी कॅनॉल, चाऱ्या आणि जलवाहिन्यांसाठी दिल्या. मात्र, प्रत्यक्षात पाणी वितरण सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटत आला, तरी भाटेगाव वितरिकेच्या उजव्या कालव्यामार्फत या भागातील शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आता संतापात बदलत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतानाच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी दररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि अगदी रात्री उशिरापर्यंत कालव्याकडे डोळे लावून बसत आहेत. पाणी सुटले का, आपल्या गावापर्यंत कधी पोहोचणार, याची प्रतीक्षा करत असतानाही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
दरम्यान, भाटेगाव वितरिका, वंजारी डिग्रस कॉलनी आणि वडगाव मायनरवरील शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला कार्यकारी अभियंता आनंद संभाजीराव धुळगुंडे, कॅनॉल इन्स्पेक्टर नवघरे, उद्धव करपे तसेच परिसरातील शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. वसमत तालुक्यातील भाटेगाव वितरिकेवरील शेवटची गावे पिंपराळा आणि गिरगाव येथे पाणी पोहोचल्यानंतर तीन दिवसांनी वडगाव मायनरचे गेट उघडण्यात येईल, असे नियोजन बैठकीत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, नियोजनानुसार दिलेला शब्द पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.
केवळ शेतीसाठीच नव्हे, तर पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठीही तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दांडेगाव येथून येणारी रेडगांव नदी, डिग्रस हून लेंडी नाला तसेच जवळा पांचाळ परिसरातील रेडगाव, वडगाव, वसफळ आणि सालापूर या भागातील मायनर व नाल्यांमध्ये पाणी सोडल्यास शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांना मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या पाण्याअभावी पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करण्याकरिता शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याचे पहिले रब्बी आवर्तन १ ते २४ नोव्हेंबरदरम्यान नियोजित होते परंतु आजपर्यंत या भागात पाणीच आले नाही.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७ नोव्हेंबर रोजी ५५.९७ टक्के असल्याची नोंद आहे. धरणात पाणीसाठा उपलब्ध असताना आणि पाणी वितरण सुरू असतानाही धरणाच्या लाभक्षेत्रातील काही गावांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर या वितरण व्यवस्थेचे नियोजन नेमके कोणासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
धरणासाठी जमिनी दिल्या, मग हक्काच्या पाण्यासाठी वणवण का?
इसापूर धरणाच्या पाण्याचा लाभ तेलंगणाच्या टोकापर्यंत पोहोचत असताना धरणाच्या परिसरातील आणि हिंगोली जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील गावांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. प्रशासनाने केवळ मुख्य कालव्याच्या पाणी वितरणाचा विचार न करता भाटेगाव वितरिकेच्या उजव्या कालव्यावरील शेवटच्या गावांनाही समान न्याय द्यावा. रेडगाव, वडगाव, सालापूर, लहान डिग्रस,वंजारी डिग्रस आणि परिसरातील शेतकऱ्यांना तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नदी, नाले आणि मायनरमध्येही पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने न्याय्य भूमिका घेतली नाही, तर शेतकऱ्यांवरील हा अन्याय सहन केला जाणार नाही. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा परिसरातील संतप्त शेतकऱ्यांमधून दिला जात आहे यापुढे जाऊन रेडगांव येथील संजय महाराज रेडगांवकर यांनी गेटवर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे