मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पारदर्शक व ग्रामविकासाला दिशा देणारे अभियान – सभापती राम शिंदे

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 28/11/2026 5:11 AM



‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावांचा संकल्प’; अहिल्यानगर येथे नाशिक विभागस्तरीय पुरस्कार वितरण, कार्यशाळा व सरपंच परिसंवाद उत्साहात संपन्न

अहिल्यानगर, दि. २७ नोव्हेंबर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ पुरस्कार मिळविण्यापुरते मर्यादित नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे पारदर्शक आणि परिणामाभिमुख अभियान आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढविण्याबरोबरच गावांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या अभियानातून दिशा मिळत आहे, असे प्रतिपादन विधानसभा सभापती राम शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ अंतर्गत ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावांचा संकल्प’ या विषयावरील नाशिक विभागस्तरीय कार्यशाळा, पुरस्कार वितरण सोहळा व सरपंच परिसंवाद शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथील द्वारका लॉन, नेप्ती चौक, नगर-कल्याण रोड येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम करून शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.

सभापती राम शिंदे यांनी गावांच्या विकासासाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धन या विषयांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. ग्रामस्थांनी एकत्रितपणे विकासाचे नियोजन केल्यास उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर होऊन विकासकामांना अधिक गती मिळेल. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे काम इतर गावांसाठी प्रेरणादायी असून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट असून शहरांप्रमाणे गावांचाही विकास होणे आवश्यक आहे. ग्रामविकासासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. अभियानात राज्यातील ५ हजार ६४४ गावांनी सहभाग घेतला असून ४ हजार १८ ग्रामपंचायतींच्या वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. ४ हजार ४७ गावांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली असून ५ हजार १५८ ग्रामपंचायतींनी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतून ३ लाख ६० हजार घरे पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यमंत्री योगेश कदम यांनी अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची सांगड घालून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला. दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के ग्रामपंचायतींचा सहभाग अपेक्षित असून वनराई बंधारे, जलस्रोत पुनर्जीवन आणि लोकसहभागातून विकासकामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी हवामान बदल, घटती भूजल पातळी आणि पाण्याचा वाढता वापर लक्षात घेता प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली. अभियानाच्या पुढील टप्प्यात जलसुरक्षेला महत्त्वाचा निकष बनविण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी विश्वनाथ कोरडे यांनी जलतारा जलसंधारण उपक्रमासाठी वैयक्तिकरित्या ५ लाख रुपयांची देणगी दिली.

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव

नाशिक विभागस्तरावर ग्रामपंचायत दुगांव (ता. जि. नाशिक) हिने प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविले. ग्रामपंचायत रेनवडी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हिने द्वितीय क्रमांक व ८० लाख रुपये, तर ग्रामपंचायत लोणी बु. (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हिने तृतीय क्रमांक व ६० लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले.

अहिल्यानगर जिल्हास्तरावर ग्रामपंचायत कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) हिने प्रथम क्रमांक व ५० लाख रुपये, ग्रामपंचायत सौंदाळा (ता. नेवासा) हिने द्वितीय क्रमांक व ३० लाख रुपये, तर ग्रामपंचायत हिवरे बाजार (ता. अहिल्यानगर) हिने तृतीय क्रमांक व २० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले.

कार्यशाळेत जलसंधारण, पाण्याचे नियोजन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, लोकसहभाग आणि ग्रामविकासाच्या विविध उपाययोजनांवर सरपंच परिसंवादातून विचारमंथन करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अभियानाची संकल्पना आणि नाशिक विभागातील कामांचे सादरीकरण केले. ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुनील कर्जतकर, काशिनाथ दाते, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, अमोल खताळ, अक्षय कर्डिले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह नाशिक विभागातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले, तर आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी मानले.

---

पत्रकार रवीकुमार शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य

#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान #ग्रामविकास #अहिल्यानगर #नाशिकविभाग #दुष्काळावरमात #समृद्धगाव #रामशिंदे #जयकुमारगोरे #ग्रामपंचायत #महाराष्ट्रशासन

Share

Other News

ताज्या बातम्या