भगूरकरांची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण; भगूर शहरातूनच धावणार नाशिक सिटीलिंकची पहिली बस, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
भगूर:
भगूर शहरातील विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातून सकाळी ६:४५ (पावणे सात) वाजता सुटणारी नाशिक सिटीलिंक बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांकडून होत असलेल्या या मागणीला मूर्त स्वरूप मिळाल्याने भगूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असा असेल बसचा मुख्य मार्ग:
ही बस भगूर शहरातूनच थेट नाशिककडे रवाना होणार असून, शहरात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील प्रमुख थांब्यांवरून सेवा देईल:
बलकवडे व्यायामशाळा,आठवडे बाजार,साईबाबा मंदिर,आहुजा कॉम्प्लेक्स
,नूतन गेट समोर,मुख्य बस स्टॉप
विद्यार्थी व नोकरदारांना मोठा दिलासा:
सकाळच्या वेळी नाशिक शहरात शाळा, महाविद्यालये व क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामावर जाणाऱ्या नोकरदारांना वेळेवर पोहोचणे आता शक्य होणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून प्रवासाची मोठी सोय झाली आहे.
"भगूरकरांच्या मागणीला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे. या बससेवेमुळे शहराच्या मूलभूत सुविधांच्या विस्ताराला एक नवी दिशा मिळाली आहे."
असे भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांनी सांगितले.
या बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, पालिका सभापती काकासाहेब देशमुख, नगरसेवक विशाल बलकवडे, लताताई थापेकर यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.