आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा, दि. ऑगस्ट २०२५: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी सातारा जिल्ह्यासह राज्यातील २७ जिल्ह्यांचा दौरा करून मागासवर्गीय समाजाच्या समस्यांचा आढावा घेतला आहे. सातारा दौऱ्यादरम्यान त्यांनी नगरपंचायत आणि नगरपालिकांमधील अनुसूचित जाती-जमातीच्या अनुकंपा तसेच इतर योजनांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय उमेदवारांचे प्रतिनिधित्व करत विविध स्तरांवर बैठका आयोजित करून ही प्रकरणे मार्गी लावल्याचे त्यांनी नमूद केले.
लोखंडे यांनी आयोगाच्या प्रभावी कामगिरीवर प्रकाश टाकताना सांगितले की, मुंबई कार्यालयातील तक्रारींची गर्दी कमी करण्यासाठी आयोग स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तक्रारींचा निपटारा करत आहे. यामुळे मागासवर्गीय समाजाला तात्काळ न्याय मिळण्यास मदत होत आहे. सातारा जिल्ह्यात वाढत्या अॅट्रॉसिटी प्रकरणांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मागासवर्गीय वसाहतींवर हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये प्रशासकीय यंत्रणेने निःपक्षपणे आणि तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी मांडली.
समाज कल्याण विभागाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्षम उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या बदलत्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना, केवळ औपचारिक नव्हे तर परिणामकारक उपक्रम राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आयोग मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमीच तत्पर असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
लोखंडे यांच्या २७ जिल्ह्यांच्या दौऱ्याने आयोगाच्या सक्रिय भूमिकेला बळ मिळाले असून, प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करत मागासवर्गीय समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.