वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने केली, मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.
सांगली, दि. २८/०८/२०२५
मिरजेत दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असून यामध्ये सहा मजुरे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली तर्फे करण्यात आली आहे.
या संदर्भात युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा. प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख मा. संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष मा. संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष मा. जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव मा. अनिल मोरे, तसेच जिल्हा सदस्य मा. रूपेश तामगावकर व मा. किशोर आढाव यांनी मा. सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन दिले.
युनियनच्या प्रमुख मागण्या :
१. मृत परप्रांतीय कामगाराच्या कुटुंबाला तातडीने योग्य आर्थिक भरपाई द्यावी.
२. जखमी मजुरांच्या सर्व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी कंत्राटदार व बिल्डरवर निश्चित करावी.
३. दोषींवर कामगार कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास फास्ट ट्रॅक कोर्टात दावा दाखल करावा.
४. जिल्ह्यातील सर्व बांधकाम स्थळांवर सुरक्षासाधने अनिवार्य करून विशेष पथकाद्वारे तपासणी करावी.
५. अपघातग्रस्त मजुरांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी.
६. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मृत व जखमी मजुरांना आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे.
७. मंडळाच्या माध्यमातून कामगारांची प्रत्यक्ष स्थळी नोंदणी मोहीम सुरू करावी.
८. सांगली जिल्ह्यात सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची अधिकृत नोंद ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करावी.
९. वेतन चिठ्ठ्या, हजेरी पत्रक, रजिस्टर, ईएसआयसी, पीएफ तसेच सेस भरण्याच्या पावत्यांची जिल्हास्तरीय विशेष पथकाद्वारे तपासणी करावी.
१०. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील गैरव्यवहारांवर "SIT" मार्फत चौकशी करून जबाबदार असणारे तत्कालीन अध्यक्ष तसेच विद्यमान सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
युनियनने स्पष्ट केले की, कामगारांच्या सुरक्षेसंबंधी नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात. त्यामुळे शासनाने व कामगार विभागाने तातडीने पावले उचलून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी,सां.मि.कु. मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संगाप्पा शिंदे, बाळू सावंत, उत्तर साबळे, लक्ष्मण जगधने, विनायक मेलगे, रोहित मेलगे, महावीर गिरगावकर, नंदकुमार जावीद आदी प्रामुख्याने उपस्थित होते.