अखेर सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर मिरज कलबुर्गी एक्सप्रेस धावणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/08/2025 12:52 PM

*आमदार सुरेशभाऊ खाडे,रेल्वे सल्लागार समिती सदस्य व रेल्वे प्रवासी संस्थांच्या मागणीला यश*

         सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर किंवा मिरज कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी येथील प्रवासी संघटना, सल्लागार समिती सदस्य तसेच प्रवासी व नागरिकांनी केली होती. यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णवजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली होती.तसेच यासाठी अनेक स्तरातून पाठपुरवठाही होत होता.

 याच मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वे कडून पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेवेळी सकाळच्या सत्रामध्ये 01 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 च्या दरम्यान गाडी क्र.01107/08 मिरज कलबुर्गी मिरज स्पेशल गाडी सुरु केलेली होती.

 आता मध्य रेल्वे कडून गाडी क्रमांक 01209/ 01210 कोल्हापूर मिरज कलबुर्गी एक्सप्रेस दिवाळी हॉलिडे स्पेशल धावण्यास मान्यता देण्यात आली आहे. या गाडीच्या एकूण 58 फेऱ्या होणार असून ती 24 सप्टेंबर 2025 पासून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे. आठवड्यातून सहा दिवस (शुक्रवार वगळून) ही गाडी धावणार आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या सल्लागार समिती सदस्यांनी अनेक वेळा पाठपुरवठा केला होता. विशेषतः मिरजेचे आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन सदर गाडीचा प्रस्ताव मांडला होता तसेच कलबुर्गी चे आमदार बसवराज मतीमुड यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमण्णाजी यांच्याकडे मागणी केली होती.

ही गाडी सुरू करण्यासंदर्भात मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी मिरजेचे लोकप्रिय आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे कलबुर्गी चे लोकप्रिय आमदार माननीय बसवराज  मतिमुड व सांगली व सोलापूर जिल्ह्यातील खासदारांची मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यांच्या सहकार्याने भेट घेऊन या आशयाचे पत्रे देण्यात आली होती.

   या गाडीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्याला जोडणारी ही सेवा प्रवाशांना वरदान ठरणार आहे.

   या गाडीस एकूण 18 डबे असतील यातील सहा जनरल, सहा स्लीपर चार एसी थ्री टायर दोन एसएलआर अशी डब्याची रचना असून या गाडीस हातकलंगडे, जयसिंगपूर, मिरज जंक्शन, आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमंकाळ, लंगारपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबाडोंगरगाव, जावळे, वसूद, सांगोला, पंढरपूर,मोडलिंब, कुर्डूवाडी व सोलापूर हे थांबे असतील.

कोल्हापुर येथुन सकाळी 06:10 वाजता निघेल व मिरज येथुन सकाळी 07:50 वाजता निघेल सोलापुर येथे दुपारी 02:30 वाजता पोहचेल व कलबुर्गी येथे दुपारी 04:10 वा.पोहचेल परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथुन संध्याकाळी 06:10 वाजता निघेल व सोलापुर येथुन रात्री 08:30 वाजता निघुन मिरज येथे पहाटे 03:00 वा.पोहचेल व कोल्हापुर येथे पहाटे 05:40 वाजता पोहचेल.

            हि गाडी सुरु झाल्यामुळे पंढरपुरच्या विठोबा बरोबर सोलापूर चे सिद्धेश्वर, तुळजाभवानी, अक्कलकोट चे स्वामी समर्थ तसेच गाणगापूर चे श्री दत्त यांचे दर्शन घेण्याची सुविधा होणार आहे. तरी ही गाडी प्रवांशाच्या सोईची व उपयुक्त अशी असल्यामुळे ती कायमस्वरूपी चालवण्यात यावी व या गाडीस "देवदर्शन एक्सप्रेस" असे नाव देण्यात यावे.व या गाडीस अक्कलकोटरोड,दुधनी व गाणगापुर या ठिकाणी थांबे देण्यात यावेत अशी मागणी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सोपान भोरावत, कुंदन भोरावत, मधुकर साळुंखे, पांडुरंग लोहार, वाय. सी. कुलकर्णी महेश शिंदे आदींनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या