चंद्रपूर: "फोडा आणि राज्य करा" या राजकारणाची भाजपची रणनीती आता नवीन पातळीवर पोहोचली आहे, असा आरोप चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. जिवंत नेत्यांना पक्षात ओढून पक्ष फोडण्याचे राजकारण भाजपने आता दिवंगत नेत्यांपर्यंत नेले आहे.
याचाच प्रत्यय वरोरा, भद्रावती शहरात आला, जिथे लावण्यात आलेल्या भाजपच्या एका बॅनरवर चक्क काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा फोटो वापरण्यात आला. ही घटना केवळ एक चूक नसून, सत्तेच्या लालसेपोटी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे दर्शवते अशी टीका राजकीय वर्तुळात होत आहे.
ज्यांनी आयुष्यभर भाजप विरोधी काम केले, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करणे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे. भाजपने आता दिवंगत नेत्यांच्या प्रतिमेचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी सुरू केल्याने, त्यांच्या राजकीय धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे समाजमाध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपच्या या "खेळी"मागे नेमका काय उद्देश आहे, हे स्पष्ट नसले तरी, सत्तेच्या या खेळात भाजपने आता नैतिकतेची सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे. या घटनेने स्थानिक राजकारणात एक नवा आणि वादग्रस्त अध्याय सुरू झाला असून यामुळे चक्क भाजप कार्यकर्ते संभ्रमात आहे.