जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पत्रकार संघटना आक्रमक; लवकरच रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा
मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी आज दुपारी एक वाजता मुंबईतील पत्रकार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. मुंबईतील 10 प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचा”च्यावतीने दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खूप मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पहात आहे. या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी पुढाकार घेत कायद्याला ठामपणे विरोध करण्याचा भूमिका घेतली पाहिजे, असे मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण, बी यू जे चे इंद्रकुमार जैन, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे, पुण्यनगरी चे संपादक शैलेन्द्र शिर्के, संपादक विनोद साळवी, संपादक तुलसीदास भोईटे, ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक, प्रवीण पुरो, दिलीप सपाटे, विशाल सिंग आदींची यावेळी भाषणे झाली.
मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांचे सदस्य यावेळी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रस्तावित कायद्याला विरोध करणारी चळवळ सुरू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यानुसार मंचाच्यावतीने लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या तीव्र भावना त्यांच्याकडे व्यक्त करण्यात येणार आहेत, तसेच हा जाचक कायदा रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे.
विविध पक्षांच्या प्रमुखांनाही भेटून त्यांनी जनसुरक्षा कायद्यास विरोध करणारी भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती केली जाणार आहे. असे ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण यांनी सांगितले. आजच्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर शासनाने जर प्रतिसाद दिला नाही, तर राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरतील, त्याची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल, असा इशाराही मंचाच्यावतीने एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण यांनी दिला आहे.
पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच या शिखर संघटनेच्या माध्यमातून पुकारलेल्या आजच्या आंदोलनात सहभागी झालेल्या संस्थांमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ
मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन मुंबई हिंदी पत्रकार संघ या संघटना सहभागी झाल्या होत्या.