आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमपीएससीत
मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार
सातारा : - नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाज्योतीने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या 'इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी' (राजपत्रित) पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेच्या मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे हिने महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बहुजन कल्याण व स्त्रीशिक्षण या विचारांवर उभारण्यात आलेल्या ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन हे यश प्राप्त केले आहे. या घवघवीत यशामुळे आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.