नांदेड - शेतकरी व पशुपालक आपल्या जनावरांवर मुलाप्रमाणे प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. माळेगाव यात्रा ही केवळ उत्सव नसून शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे पशु, अश्व, श्वान, शेळी, कुक्कुट प्रदर्शन व दुग्ध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. आज माळेगाव येथे बक्षीस वितरण आ. प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, यात्रा सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पाडीलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, कल्याणकर सावकार सूर्यवंशी, डॉ. प्रमोद पाटील चिखलीकर, आनंदराव ढाकणीकर, सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, बाळू बाबर, रोहीत पाटील अंडगेकर, अनिल बोरगावकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, पोलीस निरीक्षक संजय निरपत्रेवार, डॉ. सुनील गिरी, डॉ. निरंजन बागल, डॉ. उपेंद्र गायकवाड, आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, माळेगाव यात्रेचा पशुपालकांच्या मेहनतीला व शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम करणारा वारसा कायम राखत यंदा लाल कंधारी वळूसह यावर्षापासून मादी गटासाठी देखील चॅम्पियनशिप पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
माजंरमचा लाल कंधारी वळू तर हासूळची गाय ठरली चॅम्पियन
जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत लाल कंधारी वळू मध्ये नांयगाव तालुक्यातील माजंरम यथील पशुपालक श्रीपती देवराव शिंदे यांचा वळू माळेगाव चॅम्पियन तर सुमीत्रा रामेश्वर सुर्यकांबळे यांची देवणी गाय माळेगाव चॅम्पियन ठरली आहे. या दोन्ही पशुपालकांना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते अनुक्रमे लाल कंधारी वळू पालकास 1 लाख रुपये तर गाय पालकास रुपये 50 हजाराचा धनादेश व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धतील विजेत्यांना यावेळी रोख रक्कम व प्रमाणपत्र वाटतप करण्यात आले.
आज शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा फड आणि अश्व शर्यतही माळेगाव येथे पार पडली. 29 डिसेंबर पासून या ठिकाणी कृषी, माती, शेती, पशुशी संबंधित विविध उपक्रम जिल्हा परिषद नांदेड लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आले. ऐतिहासिक व पारंपारिक यात्रेनिमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. आज शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनाचा समारोप करण्यात आला आहे.