मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत विशेष मोहिमेंतर्गत 6 ते 20 जानेवारी कालावधीत गतीमानता पंधरवड्याचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 06/01/2025 7:20 PM

नांदेड :-  सुशिक्षित बेराजगार युवक व युवती यांनी आपला स्वत:चा उद्योग/व्यवसाय स्थापन करावा, या उद्देशाने राज्य शासन पुरस्कृत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही शासनाची महत्वाकांक्षी योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते. योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हयात मोठया प्रमाणावर उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून 6 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतीमानता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

तरी नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयातील इच्छुक व होतकरु युवक/युवती यांनी तसेच बेरोजगार युवक व युवती यांनी नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे वा व्यवसायवाढ करावयाची आहे अशा इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या योजनेतंर्गत प्रक्रिया असलेल्या/उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाख रुपयांपर्यंत या प्रकल्प मर्यादेत कर्ज दिले जाते. ज्यात  सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 15 टक्के अनुदान दिले जाते. तसेच राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते. योजनेचे https: maha-cmegp.gov.in संकेतस्थळ असून पात्रतेसाठी अर्जदार हा 18-45 व राखीव प्रवर्गासाठी 18-50 वर्षे वय असावे. आवश्यक कागदपत्रांमध्ये, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आहे. आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागाकरीता लोकसंख्येचा दाखला इ. वेबसाईटवर अपलोड करावी.

 या गतिमानता पंधरवडातंर्गत जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी जनजागृती, प्रचार, प्रसिध्दी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. ज्याद्वारे या योजनेतंर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रस्ताव अर्ज प्राप्त असल्यास योजनेच्या अटी व शर्ती तपासून संबंधीत बँकांकडे शिफारस करणे, प्रलंबित अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे, नामंजूर प्रकरणात अर्जदारास परिपूर्ण व योग्य ती माहिती देण्यात येणार आहे.  तसेच एक गांव एक उद्योजक या धर्तीवर प्रत्येक गावातून किमान एका पात्र अर्जदाराची निवड करण्यात येत  आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या