नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारकडून ज्या ज्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्या योजना प्रभावीपणे राबवत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळवून द्या असे निर्देश खा.डॉ. अजित गोपछडे यांनी देगलूर आणि बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत दिले .
यावेळी देगलूर येथे पार पडलेल्या बैठकीस आ. जितेश अंतापुरकर, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील ,तहसीलदार भरत सूर्यवंशी , बीडिओ शेखर देशमुख, अनिल पाटील खानापूरकर, प्रशांत दासरवार, शंकरराव कंतेवार,शिवाजीराव कणकंटे, यादवराव देसाई, पंकज देशमुख, रवी पाटील नरंगलकर, प्रकाश पाटील बेंबरेकर,रमेश कंतेवार, अशोक साखरे, प्रशांत पाटील आचेगावकर, रुपेश पाटील भोकसखेडकर, दिपक शहाणे, शिवराज पाटील माळेगावकर, शिवकुमार देवाडे, प्रशांत पाटील भोकसखेडकर, अशोक गोपछडे, बसवंत गोपछडे, बालाजी पाटील वन्नाळीकर, सुभाष माटलवार, अशोक पाटील शेवाळकर तर बिलोली येथे पार पडलेल्या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी कांती डोंबे , उपविभागीय पोलिस अधिकारी रसुल शेख , तहसिलदार गजानन शिंदे , गटविकास अधिकारी पद्दमवार , भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, उमाकांतरराव गोपछडे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे, विश्वनाथ पाटील समन, तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
देगलूर आणि बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत बोलताना खा. डॉ. अजित गोपछडे पुढे म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे या साठी विशेष प्राधान्य देऊन पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी तेही नियमित आणि भरपूर मिळाले पाहिजे यासाठीच्या उपाययोजना करा. ज्या ठिकाणी योजनांची कामे सुरू आहेत त्या कामांना गती द्या . कामे नियोजित वेळेत पूर्ण करून प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे भरपूर आणि शुद्ध पाणीपुरवठा करा अशा सूचना देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून कोणताही शेतकरी सुटू नये .प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांना विम्याचे सुरक्षा कवच मिळाले पाहिजे यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात . ज्यांना स्वतःची पक्की घरी नाहीत अशा कुटुंबांना त्यांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी लागू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा योग्य वेळी करण्यात यावा. शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची कोणतीही अडचण भासू नये यासाठी महावितरणने रोहित्र वेळेवर उपलब्ध करून द्यावेत. अनावश्यक भारनियमन करू नये . शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या डीपी जळाल्यानंतर 24 तासाच्या आत तेथे नव्या डीपी पूर्ववत आणि दर्जेदार असणाऱ्या बसाव्यात शिवाय याचवेळी गावठाण मधील डीपींची व्यवस्था ही तातडीने करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्वच घटकांच्या विकासाचा समतोल राखण्याच्या अनुषंगाने आणि शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचे अनुषंगाने असंख्य योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्याचे अनुषंगाने विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. एकही लाभार्थी कोणत्याही योजने पासून वंचित राहिला नाही पाहिजे. लाभार्थ्याला योजनेचा लाभ देत असताना त्याची आर्थिक पिळवणूक होता कामा नये अशा सूचनाही यावेळी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या. याच वेळी देगलुर आणि बिलोली या दोन्ही तालुक्यातील विविध विकास कामांचा आढाव ही यावेळी खा.डॉ. गोपछडे यांनी घेतला.