▫️वणी गोळीबारातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अभिवादन
▫️महागाईचे विरोधात झाले होते आंदोलन
वणी : महागाई म्हटले की सर्वसामान्य लोकांचे बजेट बिघडवणारी भयानक परिस्थिती असते आणि त्यामुळे त्रस्त जनता महागाईला भस्मासुरच मानत असते म्हणून जनता वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून त्याचा प्रतिरोध सुद्धा करीत असते. अश्याच प्रकारचा उद्रेक वणी मध्ये झाला आणि त्याला थांबविण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि ह्या गोळीबारात सात जणांचा बळी गेला. ही घटना वणीचा इतिहासातील काळा दिवस ठरली. ह्या गोळीबारात बळी ठरलेल्या हुतात्म्यांना वणी येथील त्यांचा स्मारकावर पुष्पहार व फुले वाहून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने अभिवादन करण्यात आले.
सन १९७४ साली महागाईचा भस्मासूर जनतेसमोर उभा ठाकला होता आणि त्याचा विरोध जनता करीत होती. वणी येथे सुद्धा कृती समिती स्थापून २ जानेवारीला महागाईचा विरोध करण्यासाठी आंदोलनाचा दिवस ठरला. परंतु वणी पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना अटक करून घेतल्याने आंदोलनासाठी जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. जनता स्वयं स्फुर्तीने पोलीस स्टेशन कडे निघाले. जनतेमध्ये प्रचंड रोष होता. जनतेचा रोष बघता पोलिसांनी नेतृत्वांना सोडून दिले. त्यामुळे जनतेचा रोष कमी झाला परंतु काही असामाजिक तत्वांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली होती त्याला पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु जनता जुमानत नाही हे पाहता पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर गोळीबार केला आणि ह्यामध्ये ७ जणांचा बळी गेला.
ह्या १९७४ मधील आंदोलनाच्या नेतृत्वातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शंकरराव दानव हे एक होते. कॉ. दानव ही घटना आठवूनच शहारून जात असत. ते दरवर्षी ह्या हुतात्म्यांच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहून त्यांना अभिवादन करीत असत. मागील वर्षी ३१ जानेवारीला त्यांचे निधन झाले असले तरी त्यांचा पश्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने खंड न पडू देता पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. विष्णू दानव तसेच पेंटर मधुकर ह्यांनी स्मारकावर जाऊन गोळीबारातील हुतात्म्यांना अभिवादन केले.