नांदेड : नांदेड मध्ये केळी, हळद व अन्य अनेक क्षेत्रात अव्वल पद्धतीचे निर्यातदार होण्याची ताकद आहे. इथल्या शेतकऱ्यांनी,व्यापाऱ्यांनी,प्रशासनाने जोर लावल्यास ही बाब सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे नांदेड निर्यातदार जिल्हा म्हणून नावलौकिकाला आणण्यासाठी आपापल्या भूमिका नुसार प्रयत्न करूया, असे प्रतिपादन विदेश व्यापार महानिदेशालयाचे अधिकारी जयंतकुमार रावल यांनी केले आहे.
जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्या पुढाकारात उद्योग संचालनालय मुंबई मार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा ( एक्सपोर्ट प्रमोशन वर्कशॉप ) आयोजित करण्यात आली होती. 16 डिसेंबर रोजी झालेल्या या उद्योग भवनातील कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी या संदर्भात विचार मंथन केले.
या कार्यशाळेत विदेश व्यापार महानिदेशालयाचे जयंतकुमार रावल, मुख्य डाक कार्यालयाचे अधीक्षक कुलकर्णी, TJSB बँकेचे निखील गोसावी, अग्रणी बँक अधिकारी अनिल गचके,तसेच उद्योग आघाडीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक हर्षद शहा, जिल्हयातील केळी निर्यातदार श्री. देशमुख आणि निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, कृषी उत्पादक, प्रक्रिया उत्पादक इत्यादी उद्योगाशी संबंधीत उपक्रमाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सदर कार्यशाळेचा उद्देश हा राज्यामध्ये निर्यात क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्हयाला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र (District as Export Hub) उपक्रमाला प्रोत्साहन देणे हा आहे, असे जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले.
कार्यशाळेत विदेश व्यापार महानिदेशालय (DGFT) पुणे येथील जयंतकुमार रावल यांनी मार्गदर्शन करतांना,
निर्यात बाबत महत्व व प्रक्रिया विषद केली. अनिल मोहिते यांनी कोरोनानंतर निर्यातीमध्ये झालेल्या वाढीचे प्रमाण हे सन 2029-2030 पर्यंत दुपटीने होईल असे सांगितले. देशात महाराष्ट्र राज्याचा निर्यातीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये संभाजीनगर जिल्हयाचा इंजिनिअरिंग क्षेत्रात तर नांदेड जिल्ह्याचा फार्मास्युटीकल क्षेत्रात अग्रेसर आहे.तसेच जेम्स व ज्वेलरी, कृषी, वैद्यकीय आणि सेवाक्षेत्र आयटी, बँक क्षेत्रांमध्ये निर्यात होत असल्याचे कथन केले.
ग्रामीण भागातील उद्योजकांच्या उत्पादित वस्तूंच्या निर्यातीसाठी डाक निर्यात केंद्राची उपयुक्तता मुख्य डाक कार्यालयाचे अधीक्षक श्री.कुलकर्णी यांनी सांगितली. ई-कॉमर्सद्वारा उत्पादित वस्तूची ऑर्डर आल्यास, पोस्टाद्वारे करण्यात येणारी कस्टम क्लीअरन्सची प्रक्रिया विषद केली.
निखील गोसावी यांनी निर्यातीबाबत TJSB ही कॉपरेटीव्ह बँक कमी दराने अर्थसहाय्य करत असल्याचे सांगितले. SWIFT (Society For Worldwide Interbank Financial Telecommunication) द्वारा होत असलेल्या आयात-निर्यातीबाबत प्रक्रिया विषद केली.
देशातंर्गत व जागतिक पातळीवर बाजारपेठ मिळविण्यासाठी निर्यातीबाबत केलेली कार्यवाही, प्रयत्नांची माहिती व जिल्हयांमधील उद्योजकांमध्ये जागरुकता निर्माण करुन निर्यात वाढीसाठी प्रेरीत माहिती केळी, हळद निर्यातदार श्री.देशमुख यांनी कार्यशाळेत दिली. त्यांनी कृषी आधारीत केलेल्या उत्पादित वस्तू निर्यातबाबत संभाव्य अडचणी व त्यावरील करण्यात येणारी उपाययोजना आदी बाबत सविस्तर सांगितले.
सुरूवातीला या एक दिवसीय कार्यशाळेची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलाने सुरुवात करुन पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेचा समारोप उद्योग निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनानंतर करण्यात आला.