चिखलदरा येथील राज्यस्तरीय सिंहावलोकन शिबिरात निर्णय.
: संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिखलदरा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यस्तरीय सिंहावलोकन शिबीर व राज्यस्तरीय ओबीसी परिषद घेण्यात आली. यावेळी ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी २० फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी दिली.
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय
अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर, राष्ट्रीय सचिव शरद वानखेडे, शिबिराचे स्वागतध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे, प्रकाश भागरथ, ज्योती ढोकणे, रत्नमाला पिसे, श्याम लेडे, ऋषभ राऊत, बबलू कटरे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात राज्यभरातून तीनशेपेक्षा अधिक मान्यवर आले होते. उपस्थितांना डॉ. तायवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सचिन
राजूरकर यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर २०२४ रोजी ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारने ओबीसी महासंघासोबत बैठक घेतली होती. त्यावेळी मंजूर झालेल्या अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. या ज्वलंत मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी २० फेब्रुवारीला राज्यभर धरणे देण्यात येणार आहे. तसेच, ओबीसींच्या मागण्यांवर जनजागृती करण्यासाठी संवाद दौरे करण्यात येतील. या परिषदे दरम्यान संघटनेची दिशा व धोरण याबाबत कृती आराखडा सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अशी माहिती राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर यांनी दिली.