चंद्रपूर - जीवती तालुक्यातील जनता अत्यंत विपरीत परिस्थितीत शेतीतून उत्पादन घेऊन नवा आदर्श स्थापित करीत आहे. येथील जनतेच्या अनेक समस्या आहेत. त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करु, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जीवती तालुक्यातील वणी (बु.)येथील सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष भाजयुमो महेश देवकते, विवेक बोढे, नामदेवराव डाहुले, सतीश उपलेंचीवार, दत्ता राठोड तालुका अध्यक्ष, केशव गिरमाजी जिल्हा उपाध्यक्ष, बळीरामजी देवकते माजी पंचायत समिती सदस्य, अंजनाताई पवार, राजेश राठोड, गोविंद टोकरे, प्रल्हाद मदने, पुष्प सोयम, तुकाराम वारलवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत व विशाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. चिमुकल्यांनी परंपरागत संस्कृतीचे प्रदर्शन करुन स्वागत केले. या स्वागत आणि सत्काराचा स्वीकार करुन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभार मानले व चिमुकल्यांचे कौतुक केले. जनतेचे प्रेम हिच कामाची पावती आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
जीवती तालुक्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये देवराव भोंगळे यांना निवडून दिल्याचा आनंद झाला. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करुन आलेले भोंगळे हे जनतेवर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, असेही ते म्हणाले.
प्रलंबित कामे मार्गी लावू
जीवती तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत. येथील शेतकरी खडकाळ, डोंगराळ जमिनीवर शेती करतात. जीवती येथील नागरिकांनी दगड फोडून पाणी काढावे, एवढे परिश्रम केले आहेत. त्यामुळे येथील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.