उध्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य : जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/02/2025 8:40 PM

 सांगली, दि. 3,
 उद्योजकांच्या समस्या संबंधित यंत्रणांनी कालमर्यादा ठरवून प्राधान्याने सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिल्या.
 जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका उपायुक्त शुभम गुप्ता, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदि उपस्थित होते.
 या बैठकीत औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, रस्ते दुरूस्ती, गतिरोधक, पथदिवे, अतिक्रमण काढणे व त्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देणे, सुरळीत वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, उच्च दाब विद्युत वाहिनी, कचरा डेपो, अनावश्यक विजेचे खांब हटविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महानगरपालिका, ग्रामपंचायत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि संबंधित यंत्रणांनी त्यांच्यांशी संबंधित असलेल्या औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांवर प्राधान्याने व सकारात्मकतेने कार्यवाही करून उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात. रस्त्यांची व अन्य कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिले.
 बैठकीस एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज ॲण्ड कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे, सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मिरज चे अध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके, गोंविदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे संतोष भावे, बामणोली असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनंत चिमड यांच्यासह आद्योगिक वसाहतीतील विविध उद्योजक उपस्थित होते. 
 यावेळी जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक लोकांना रोजगार, जिल्हास्तरीय समिती, जिल्हा निर्यात प्रचालन समिती आदि समितीची बैठक घेण्यात आली. तसेच जिल्हा उद्योग पुरस्कार निवड समितीची बैठकही घेण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या