नांदेड :-- माळेगाव येथे सुरू असलेल्या यात्रा कालावधीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत 24 तास आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख करत असून यात्रेकरूंच्या आरोग्याच्या काळजीसाठी व्यापक नियोजन त्यांनी केले आहे.
यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय तीन रुग्णवाहिका व आणीबाणी वैद्यकीय सेवांसाठी 10 रुग्णवाहिका तसेच 5 मोबाईल बाईक हेल्थ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. एकूण 144 अधिकारी आणि कर्मचारी या सेवेसाठी नेमण्यात आले असून यात 13 वैद्यकीय अधिकारी, 5 औषध निर्माण अधिकारी, 10 आरोग्य सहाय्यक, 27 आरोग्य सेवक तर 6 परिचारिकांचा समावेश आहे.
यात्रा परिसरात 6 ठिकाणी औषधसाठ्यासह वैद्यकीय पथके कार्यरत असून आजपर्यंत 3 हजार 535 यात्रेकरूंची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले आहे. शुद्ध पाणी पुरवठ्याची देखील विशेष काळजी घेण्यात येत असून T.C.L. व्दारे पाणी शुद्ध करून त्याचा पुरवठा केला जात आहे.
आरोग्य विषयक जनजागृतीसाठी भव्य आरोग्य प्रदर्शन उभारले असून त्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण, विविध रोगांविषयी जनजागृती, तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजना, आभा कार्ड, जननी सुरक्षा योजना यासारख्या योजनांची माहिती दिली जात आहे. या उपक्रमामुळे यात्रेकरूंना आरोग्यविषयक उत्तम सुविधा मिळत आहेत.