सांगली शहरात खडड्यांची मालिका सुरुच, १०० फुटी रस्त्यावर पडला सहावा खडडा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/09/2024 8:49 PM

**लोकहित मंचची निदर्शने; रस्त्यांच्या ऑडीटसाठी ना. गडकरींची भेट घेणार

सांगली: शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. शहरातील राजर्षी शाहू महाराज मार्ग (शंभरफुटी) रस्त्यावर दिगंबर मेडिकलजवळ पुन्हा 20 फुटाचे भगदाड पडले आहे. या विरोधात लोकहित मंचच्यावतीने जोरदार निदर्शन करत मनपाचा निषेध केला. दि. 4 ऑक्टोबरला सांगलीत ना. नितीन गडकरी येणार आहेत. त्यांच्याकडे रस्त्यांचे ऑडीट व्हावे, अशी मागणी लोकहित मंचच्यावतीने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितले.
सांगली शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या चार महिन्यांपासून भले मोठे खड्डे पडत आहेत. या खड्ड्यांची दुरूस्ती अद्याप पूर्ण होत नाही, तोपर्यंत नव्याने आणखी खड्डे पडू लागले आहेत. शंभरफुटी येथील दिगंबर मेडिकल, अहिल्यादेवी होळकर चौकासह सहा ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सहा महिन्यांपूर्वीच कोट्यावधी रूपये खर्च करून शंभर फुटी रस्ता करण्यात आला आहे. पण या रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती.
आयुक्तांनी अभियंत्यांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या रस्त्यावर तिसरा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागात केवळ ‘टक्केवारी’चा बाजार सुरू आहे. आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सहा खड्डे पडले आहेत. याचा निषेध लोकहित मंचच्यावतीने करण्यात आला. शंभर फुटी परिसरामध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.  ‘कमिशन घ्या अन् खड्डा पाडा’  अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले, सांगलीत खड्ड्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे रस्त्यांचा निकृष्ट दर्जा उघड होत आहे. दि. 4 ऑक्टोबरला  सांगलीत नितीन गडकरी येत आहेत. त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे ऑडीट करावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी, सलीम  पन्हाळकर, शिवसेना उद्धव ठाकरे गट सांगली शहर प्रमुख विराज बुटाले, अंजर फकीर, रफिक शेख, नईम मुल्ला, लियाकत शेख, समीर मोमीन आदी नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या