*पूर्ण झालेल्या घरकुलांचे ई-गृहप्रवेश संपन्न*
गडचिरोली दि. 18 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 10 हजार 425 घरकुलांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ऑनलाईन कार्यक्रमातून मंजूरी दिली असून या घरकुलांना पहिला हप्ता मिळण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यासोबतच टप्पा-1 अंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थींना प्रतिकात्मक चावी व प्रमाणपत्र देत ‘ई’ गृहप्रवेशाचा कार्यक्रम नियोजन भवन येथे संपन्न झाला.
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी सन 2024-25 या आर्थीक वर्षाकरीता महाराष्ट्र राज्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2.0 अंतर्गत 6 लाख 37 हजार 89 इतके उदिष्ट दिले आहे. तसेच सदर उदिष्ट जिल्हा व तालुका व ग्रामपंचायत निहाय आवास प्रणालीवर वितरीत करण्यात आले आहे व त्यानुसार सर्व लाभार्थ्यांना मंजुरी देवुन पहिला हप्ता वितरीत करण्याबाबतची प्रक्रीया सुरु आहे. या संदर्भात भुवनेश्वर, ओरीसा येथे 17 सप्टेबर 2024 रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2.0 अंतर्गत देशातील 10 लाख लाभार्थ्यांना ऑनलाईन पहिला हप्ता वितरीत करण्यात आला असुन त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील किमान 2.50 लाख लाभार्थ्यांना मंजुरी देवुन पहिला हप्ता वितरीत करण्याचे प्रस्तावीत होते. यामध्ये गडचिरोली जिल्हयाला 15 हजार 337 चे उदिष्ट प्राप्त झाले असुन 10 हजार 425 घरकुले ऑनलाईन मंजुर करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यासोबतच सन 2023-24 व 2024-25 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे प्रतिनिधिक स्वरूपातील चावी वितरण व ई-गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह येथे संपन्न झाले.
जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, खासदार नामदेवराव किरसान, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थीत सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी प्रास्ताविकेतून जिल्ह्यातील घरकुलांची माहिती दिली. टप्प-1 अंतर्गत 31 हजार 497 घरकुलांना मंजूरी मिळाली होती त्यापैकी 29 हजार 918 घरकुले पूर्ण झाले असल्याचे व 1579 घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सर्व गट विकास अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, घरकुल लाभार्थी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाचे कर्मचारी उपस्थीत होते.