कुपवाड शहरातील स्वामीमाळा परिसरातील दुर्लक्षित असलेल्या स्मशानभूमीमध्ये वारंवार जनावरे प्रवेश करत असल्याने तसेच काही नशेखोर युवकांकडून परिसराचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या समस्येची दखल घेत उपमहापौर गजानन मगदूम यांनी स्मशानभूमीच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत पुढाकार घेतला.
स्मशानभूमीच्या परिसराला वॉल कंपाउंड तसेच काँक्रीटीकरण करण्याचे काम मंजूर करण्यात आले असून, या कामामुळे स्मशानभूमीचे संरक्षण होण्यासोबतच परिसरात स्वच्छता व सुरक्षितता राखण्यास मदत होणार आहे.
या मंजूर कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज उपमहापौर गजानन मगदूम यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्वामीमाळा स्मशानभूमीला भेट दिली. यावेळी कामाची गुणवत्ता, परिसराची स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी स्मशानभूमी परिसरातील सुरू असलेली विविध विकासकामे, आवश्यक सुविधा तसेच कामाच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमहापौर गजानन मगदूम यांनी संबंधित कंत्राटदारास दिल्या.
कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये तसेच नागरिकांच्या अपेक्षेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
या पाहणीदरम्यान विविध समाजातील प्रतिनिधींनी स्मशानभूमीशी संबंधित आवश्यक कामे व सुविधांबाबत आपल्या सूचना उपमहापौर गजानन मगदूम यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.बाळासाहेब मंगसुळे, बापूसाहेब तोडकर, रमेश सायमोते, बाळासाहेब सायमोते, सुभाष जमदाडे, बबन तोडकर, राजू कुंभार, बाळासाहेब स्वामी, शामराव परिट, शशिकांत मगदूम दरीकांत माळी आदी उपस्थित होते.