नांदेड:-शिवांश एकनाथ नागरगोजे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान व कपडे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.नांदेड तालुक्यातील नेरली येथील मराठवाडा लोकसेवा मंडळ,नांदेड संचलित नंदनवन कुष्ठधाम येथे दि.६ ऑक्टोबर २०२६ वार मंगळवार रोजी हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.
‘मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून कुष्ठधामात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अन्नदान करण्यात आले तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले.वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या मदतीमुळे कुष्ठधामातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
शिवांशचे वडील एकनाथ नागरगोजे हे गेल्या काही काळापासून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून,स्वतःच्या वाढदिवसानिमित्तही अनावश्यक खर्च न करता वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गरजू नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करण्याला प्राधान्य देतात.नेरली कुष्ठधाम येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवणे, अन्नदान करणे,कपडे वाटप करणे, अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात.विशेष म्हणजे आपल्या मित्रमंडळींचे वाढदिवसही समाजातील गरजू व वंचित घटकांसोबत साजरे करण्यासाठी एकनाथ नागरगोजे पुढाकार घेतात.त्यामुळे वाढदिवसाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव आणि सेवाभाव जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.शिवांश एकनाथ नागरगोजे यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त एकनाथ नागरगोजे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी शिवांशला भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘समाजाचे आपल्याला काही देणे लागते’ ही भावना अधोरेखित झाली.