*सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठ्या कंपन्यांशी जोडण्याचा प्रयत्न*
म्हैसाळ : वार्ताहर
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठ्या कंपन्यांच्या पुरवठा साखळीशी जोडून त्यांना नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांगली येथे ‘रॅम्प-अँकर व्हेंडर विकास कार्यक्रम’ अंतर्गत खरेदीदार-विक्रेता मेळावा उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि., पुणे यांच्या वतीने विजयनगर येथील हॉटेल पर्ल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे होत्या. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, कोकण रेल्वेच्या नीला सेल्वन, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निखिल सावळे, मिटकॉनचे जगन्नाथ माळी, मराठा उद्योजक फाउंडेशन चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी निबे लिमिटेड, डालमिया भारत शुगर लिमिटेड, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि समृद्धी इंडस्ट्रीज या प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उद्योजकांना विक्रेता नोंदणी, खरेदी प्रक्रिया, गुणवत्ता व तांत्रिक निकष तसेच उपलब्ध व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर झालेल्या खरेदीदार-विक्रेता थेट संवाद सत्रात स्थानिक उद्योजकांना मोठ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट चर्चा करून व्यवसायाच्या संधी जाणून घेता आल्या. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील उद्योजकांसाठी हा मेळावा नव्या व्यावसायिक संधींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन मिटकॉनचे विभागीय व्यवस्थापक जगन्नाथ माळी यांनी केले.