नांदेड :- अनुबंध प्रकाशन, पुणे आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने प्रख्यात लेखिका डॉ.वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या आज (दि.८) माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार्या या कार्यक्रमास ज्येष्ठ कवयित्री नीरजा आणि प्राचार्या डॉ.गीता लाठकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मागील अनेक वर्षांपासून कविता तसेच ललित लेखन करणार्या डॉ.वृषाली किन्हाळकर यांचे हे नवे पुस्तक वेगळ्या धाटणीचे आहे. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्यांसह इतर साहित्य कृतींमधील पात्रांबद्दल विस्तृत लेखन करून आस्वादक समीक्षेचे एक नवे पुस्तक त्यांनी सिद्ध केले आहे. १९२५ नंतरच्या ७५ वर्षांतील अनेक कादंबर्यांतील वेगवेगळ्या पात्रांचा वेध घेणारे हे पुस्तक अनुबंध प्रकाशनने सिद्ध केले आहे.
वरील कार्यक्रमास साहित्यिक आणि वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांसह डॉ.माधवराव किन्हाळकर, अनिल कुलकर्णी, देवीदास फुलारी, प्रभाकर कानडखेडकर आणि प्रा.महेश मोरे यांनी केले आहे.