नांदेड:-अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून पुढे येत शिक्षण,जिद्द,मेहनत आणि प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर साखर उद्योगात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नांदेड येथील केशव मारोतराव मालेगावकर यांना संविधान दिन आणि क्रांतिवीर लहुजी साळवे जयंतीच्या निमित्ताने निमशासकीय सेवेतील गुणवंत कामगार व उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केशव मालेगावकर हे मूळचे अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत.त्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत गेले. वडील साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते तर आई मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील आठवडी बाजारात कपडे विक्रीचे काम केले. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासोबतच वडिलांनाही आर्थिक मदत केली.
शिक्षण हेच जीवन बदलण्याचे प्रभावी साधन आहे हा विचार मनाशी बाळगून त्यांनी बी.एस्सी., बी.टेक. (शुगर टेक्नॉलॉजी) आणि एमबीए (एचआरएम) असे उच्च शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे साखर कारखान्याच्या वसाहतीत राहून, मर्यादित सुविधांमध्ये त्यांनी शिक्षणाची वाटचाल पूर्ण केली.
वडिलांच्या साखर उद्योगातील अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी सन १९९४ मध्ये साखर कारखान्यात हेल्पर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.मात्र, केवळ नोकरी करण्यापुरते मर्यादित न राहता अनुभव, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पदोन्नतीची एकेक पायरी पार केली. हेल्पर, ट्रेनी केमिस्ट, लॅब केमिस्ट, डेप्युटी चीफ केमिस्ट, चीफ केमिस्ट, प्रोडक्शन मॅनेजर, जनरल मॅनेजर ते कार्यकारी संचालक असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध साखर उद्योगांमध्ये त्यांनी काम केले असून, साखरेची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, रॉ शुगर, मोलॅसिस आदी उत्पादनांबाबत विशेष कौशल्य संपादन केले आहे. दर्जेदार, पांढरी शुभ्र आणि दाणेदार साखरेचे उत्पादन करण्यासाठी त्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच काटेकोर नियोजन व व्यवस्थापनावर भर दिला. त्यांच्या कार्याचा संबंधित साखर कारखान्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेला आणि बाजारपेठेतील मागणीला लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कार्यकारी संचालक म्हणून काम करताना कामगार, ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार, मुकादम, ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी, बँका, शासकीय व निमशासकीय यंत्रणा आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. साखर उद्योगाच्या आर्थिक बळकटीसाठी कर्ज,अनुदान आणि निधी मिळविण्याकरिता शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे कामही त्यांनी केले.
केवळ स्वतःची प्रगती न साधता नवीन कामगारांना तांत्रिक ज्ञान देऊन त्यांना कुशल बनविणे, पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे, हीदेखील त्यांच्या कार्याची विशेष बाजू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामगारांनी उच्च पदांपर्यंत मजल मारली असून काहींनी परदेशातही रोजगाराच्या संधी मिळविल्या आहेत.तसेच जात-धर्माचा भेद न करता गरजूंच्या वैद्यकीय उपचार, शिक्षण आणि विवाहासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करण्याचा त्यांचा सामाजिक दृष्टिकोन आहे.
साखर उद्योगाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी साखर, गूळ पावडर आदी उद्योग प्रकल्प उभारण्याचे स्वप्नही त्यांनी व्यक्त केले आहे.एका सामान्य कामगारापासून कार्यकारी संचालक पदापर्यंतचा त्यांचा संघर्षमय प्रवास,तांत्रिक कौशल्य,कामगाराभिमुख दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने नांदेड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.