पाच वर्षाखालील बालकांना न्यूमोनियापासून वाचवा ; लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्या;‘सांस’ अभियानातून नांदेड जिल्ह्यात जनजागृतीवर भर ; बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज;न्यूमोनियाला प्रतिबंध करा,बालमृत्यू टाळा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/11/2026 4:11 AM

नांदेड :- पाच वर्षांखालील बालकांमध्ये न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘सांस’ (SAANS-Social Awareness and Action to Neutralize Pneumonia Successfully) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून बालकांमधील न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखणे, तातडीने निदान व उपचार उपलब्ध करून देणे आणि पालकांमध्ये जनजागृती करणे यावर विशेष भर दिला जात आहे. पालकांनी पाच वर्षाखालील बालकांच्या आरोग्याबाबत सतर्क राहून न्यूमोनियाची लक्षणे दिसताच जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.
 
*न्यूमोनिया बालमृत्यूचे प्रमुख कारण ; वेळीच उपचार महत्त्वाचे*
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माहितीनुसार देशात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूंपैकी सुमारे १५ टक्के मृत्यू न्यूमोनियामुळे होतात. योग्य पोषण, नियमित लसीकरण, स्वच्छता, प्रदूषणापासून संरक्षण आणि वेळेवर निदान व उपचार या उपाययोजनांमुळे न्यूमोनियामुळे होणारे अनेक बालमृत्यू टाळणे शक्य आहे. त्यामुळे पालकांनी बालकांच्या आरोग्यातील अगदी लहान बदलांकडेही दुर्लक्ष करू नये.
 
*वयानुसार न्यूमोनियाची लक्षणे ओळखा !*
बालकांना न्यूमोनिया झाल्यास त्यांच्या वयानुसार श्वासोच्छ्वासाचा वेग वाढणे, छाती आत ओढली जाणे, दूध पिण्यास त्रास होणे आणि सुस्ती येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
 
*० ते ५९ दिवसांचे नवजात बालक :*
• एका मिनिटात ६० किंवा त्यापेक्षा जास्त श्वास घेणे.
• स्तनपान करता न येणे किंवा दूध पिण्यास त्रास होणे.
• ताप येणे किंवा शरीर थंड पडणे.
• हालचाल कमी होणे अथवा असामान्य सुस्ती येणे.
• आकडी येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
 
*२ महिने ते १२ महिने वयोगट :*
• एका मिनिटात ५० किंवा त्यापेक्षा जास्त श्वास घेणे.
• श्वास घेताना छाती आत ओढली जाणे.
• दूध पिण्यास त्रास होणे किंवा बालक सुस्त होणे.
 
*१२ महिने ते ५ वर्षे वयोगट :*
• एका मिनिटात ४० किंवा त्यापेक्षा जास्त श्वास घेणे.
• श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छाती आत ओढली जाणे.
• खाणे-पिणे बंद होणे, उलट्या होणे किंवा बालक सुस्त होणे.
 
यापैकी कोणतेही गंभीर लक्षण दिसल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता बालकाला तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत घेऊन जाणे आवश्यक आहे.
 
*न्यूमोनिया प्रतिबंधासाठी ‘३ पी’ त्रिसूत्रीचा अवलंब करा !*
‘सांस’ अभियानांतर्गत संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार या तीन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
 
*संरक्षण :* जन्मानंतर पहिले सहा महिने बालकाला केवळ मातेचे दूध द्यावे. सहा महिन्यांनंतर स्तनपान सुरू ठेवून वयानुसार योग्य पूरक आहार द्यावा. तसेच बालकाला नियमानुसार जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा द्यावी.
 
*प्रतिबंध :* बालकाचे PCV, Hib, गोवर तसेच राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार सर्व लसीकरण पूर्ण करावे. बालकाला हाताळण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. घरातील धूर, धूम्रपान आणि हवेचे प्रदूषण टाळावे. घरात स्वच्छता राखून पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
 
*उपचार :* बालकाला खोकला, सर्दी किंवा जलद श्वासोच्छ्वासाची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका (ANM), सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत. उपचार सुरू असतानाही स्तनपान आणि पूरक आहार बंद करू नये.
 
*न्यूमोनिया वरील उपचारांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज*
नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्य वर्धिनी केंद्रे) आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये न्यूमोनियाच्या निदान व उपचारासाठी आवश्यक औषधे आणि उपकरणांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. बालकांच्या उपचारासाठी अॅमॉक्सिसिलीन सिरप व गोळ्या तसेच आवश्यकतेनुसार जेंटामायसिन इंजेक्शन उपलब्ध ठेवण्यात आले आहे.
 
बालकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर, श्वसनासंबंधी उपचारासाठी नेब्युलायझर आणि गरजेनुसार ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय आशा स्वयंसेविका मार्फत गृहभेटी देऊन HBNC व HBYC कार्यक्रमांतर्गत बालकांची आरोग्य तपासणी आणि मातांचे समुपदेशन केले जात आहे.
 
*पालकांनी आरोग्य विभागाच्या मोहिमेला सहकार्य करावे*
न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखून योग्य वेळी उपचार सुरू करणे हे बालकांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित लसीकरण पूर्ण करावे, आशा स्वयंसेविकांच्या गृहभेटींचा लाभ घ्यावा आणि बालकांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या