नांदेड : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, रोषणाई आणि आप्तस्वकीयांसोबत साजरा करण्याचा सण! मात्र समाजातील काही बेघर, निराधार आणि उपेक्षित व्यक्तींच्या आयुष्यात या सणाचा आनंद अनेकदा पोहोचत नाही. त्यांच्या आयुष्यातही दिवाळीचा प्रकाश यावा, त्यांनाही सणाचा आनंद अनुभवता यावा आणि आपणही समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहोत, ही आपुलकीची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून सलग सातव्या वर्षी आगळ्यावेगळ्या दिवाळी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.*
या उपक्रमांतर्गत बेघर आणि उपेक्षित व्यक्तींचे महिलांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यांना सन्मानपूर्वक दस्ती व टोपीचा आहेर देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना मिठाई तसेच जेवणाचे डबे देण्यात आले. केवळ वस्तूंचे वाटप न करता त्यांना प्रेम, सन्मान आणि माणुसकीची ऊब देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव उमटले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या प्रदेश युवती प्रमुख शाम्भवी साले उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील वंचित आणि निराधार घटकांसोबत अशा प्रकारे सण साजरा केल्याने खऱ्या अर्थाने मानसिक समाधान मिळते. अनेकजण परिस्थितीमुळे नैराश्यपूर्ण जीवन जगत असतात. अशा व्यक्तींना प्रेमाने जवळ घेणे, त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवणे आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणे, यामुळे त्यांच्या मनाला मोठा दिलासा मिळतो. अशा उपक्रमांची समाजाला नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. दिवाळीचा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. बेघर व्यक्तींनाही कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान आणि प्रेम मिळावे, त्यांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागू नये, हीच या उपक्रमामागची भावना आहे. समाजसेवा म्हणजे केवळ मदत करणे नव्हे, तर माणसाला माणूस म्हणून सन्मान देणे होय, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, राजस्थानी महिला मंडळ नांदेड, अखिल भारतीय मारवाडी महिला सम्मेलन शाखा नांदेड आणि नांदेड जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमासाठी संजय चौधरी, सुमंतसिंग ठाकूर तुळजापूर, मोहित व रेणुका सोनी, रूपाली धारूरकर, अविनाश चिंतावार, अमित धारूरकर, प्रकाश कटारे, सुरेश पळशीकर, उद्धव चौधरी, स्नेहलता जायस्वाल, प्रमोद कुरे, भास्कर खिर्डेकर, वर्षा देशमुख, अक्षय गोधमगांवकर, सतीश शर्मा, रत्नाकर देवणे, योगेश जायस्वाल, सदाशिव देशमुख, आल्हाद गोधमगावकर, संजय उत्तरवार, डॉ. हिरा तिगेलवार, कु. रेवा उदगीरकर, राजू देशमुख तसेच एका अज्ञात दात्यानी मिठाई वाटप साठी आर्थिक सहकार्य केले. आनंदकुमार स्वामी आणि केशव हळदेकर यांच्या वतीने जेवणाचे डबे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याला विशेष भावनिक स्पर्श लाभला तो महिलांच्या सहभागामुळे. शांता काबरा, रेखा शर्मा, संगीता सोमानी, रिता दायमा, गायत्री तोष्णीवाल, रिता बाहेती, दिपाली मुंदडा, शोभा तोष्णीवाल, वर्षा साबु आणि जयश्री ठाकूर यांनी उपेक्षित व्यक्तींना कुंकुमतिलक लावून, दस्ती व टोपीचा आहेर देत पारंपरिक पद्धतीने भाऊबीजेची ओवाळणी केली. या अनोख्या स्नेहबंधामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक जिव्हाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभुदास वाडेकर, अरुण काबरा, शिवचरण लोट, गणेशसिंह परमार, राहुल ठाकूर, रुद्र जोड, राजेशसिंह ठाकूर, शिवा लोट, सुरेश लोट, प्रकाश उंटवाले, विलास वाडेकर आणि जगतकाका ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश घराघरांत पोहोचतो; पण माणुसकीचा दिवा प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित झाला, तरच दिवाळी खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. बेघर आणि उपेक्षित व्यक्तींच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हीच या आगळ्यावेगळ्या दिवाळीची खरी कमाई ठरली.