नांदेड : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून बी.आर. फाऊंडेशन, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘यशोधरा गौरव सोहळा व पुरस्कार वितरण समारंभा’साठी आंबेडकरी युवा कार्यकर्ते आयु. सुभाष लोखंडे यांची प्रतिष्ठेच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक चेतना पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे.
आंबेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन तथागत गौतम बुद्ध यांची मानवतावादी शिकवण, बौद्ध संस्कृती व संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण कार्य, सामाजिक प्रबोधन, जनजागृती तसेच आंबेडकरी चळवळीतील सक्रिय योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
बी.आर. फाऊंडेशनच्या वतीने भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेल्या महाभिक्षुणी यशोधरा यांच्या जीवनकार्यावर आधारित महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच आंबेडकरी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि प्रशासकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात खासदार रविंद्र चव्हाण आणि ख्यातनाम गायिका पुष्पा पगधरे मुंढे यांच्या हस्ते मानचिन्ह, मानपत्र/ग्रंथपत्र आणि शाल देऊन आयु. सुभाष लोखंडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
सुभाष लोखंडे यांच्या या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीमुळे नांदेडच्या आंबेडकरी चळवळीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय आणि आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त उपआयुक्त प्रकाश येवले, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे, प्रा. गौतम धुथडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, इंजिनिअर डी. एम. निखाते, भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, सरचिटणीस दामोदर सरकटे, कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे, उत्तर शहराध्यक्ष ईश्वरराव जोंधळे, सरचिटणीस रमेश कोकरे, विजय खिल्लारे, कोषाध्यक्ष रामराव कदम, सेवानिवृत्त पीएसआय श्रीरंग कापुरे, बहुजन समाज पार्टीचे मराठवाडा पदाधिकारी राहुलजी कोकरे, सेवानिवृत्त शिक्षक संजय कापुरे, सहाय्यक अधीक्षक सुनीलराव खिल्लारे, इंजिनिअर संदेश थोरात, सेवानिवृत्त गट निदेशक ज्ञानोबा दुधमल, आयु. मुंजाजी कांबळे (जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी, नांदेड), आयु. सदाशिव गच्चे (जिल्हा प्रतिनिधी, लॉर्ड बुद्धा चॅनल, नांदेड), संजय पंडित, शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथील कर्मचारी, आयु. राजेश नरवडे (सैनिकी विद्यालय, सगरोळी), आयु. पृथ्वीराज विश्वनाथ चिंतुरे (सैनिक, सीमा सुरक्षा बल), आयु. इर्शाद शेख (समतादूत, बार्टी, नांदेड), ज्योतीताई जाधव (समतादूत, बार्टी), प्रशांत झिंजाडे, राहुल गायकवाड, रमेश सातोरे, गंगाधर शिराढोणकर, नरेश चित्रपु, संदीप झिंजाडे, राहुल बहादुरे, ॲड. रतन धुळे, रंगनाथ कांबळे, सचिन मस्के, मनोज वाघमारे, सिद्धांत हटकर आणि प्रशांत लोखंडे आदींचा समावेश आहे.
या निवडीबद्दल सर्व स्तरांतून सुभाष लोखंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.