नांदेड :- एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या संभाव्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2026-27 मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी विशाल वसंतराव बिऱ्हाडे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सात पिकांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) पिकासाठी 30 नोव्हेंबर 2026, गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांदा या पिकांसाठी 15 डिसेंबर 2026, तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी 31 मार्च 2027 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करता येईल. तसेच बँका, विमा कंपन्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी, पीक विमा अर्ज आणि सामूहिक सेवा केंद्रांमार्फतही सहभाग नोंदविता येईल. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक विमा नोंदणी करून आपल्या पिकांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विशाल वसंतराव बिऱ्हाडे यांनी केले आहे.