भगूरमध्ये महापुरुषांच्या मूर्तीजवळ उत्साहात दीपोत्सव साजरा; छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिव्यांची आरास करून अभिवादन
भगूर (विशेष प्रतिनिधी):
हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला, आनंदाचा, उत्साहाचा, पावित्र्याचा आणि समृद्धीचा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून भगूर शहरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भगूरचे सुपुत्र, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यांसमोर शेकडो दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
दिवाळी हा सण आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी, कौटुंबिक आनंद, उद्योग-व्यवसायाच्या ठिकाणी होणारे लक्ष्मीपूजन तसेच भाऊ-बहीण यांच्यातील पवित्र नाते अधिक दृढ करणारा उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या महापुरुषांच्या त्याग, असीम शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांमुळे आज संपूर्ण हिंदू समाजाला आपल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा सार्थ अभिमान वाटतो, अशा महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भगूरमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचा पुढाकार
भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने या भव्य दीपोत्सवाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. दिव्यांच्या लखलखाटाने दोन्ही महापुरुषांचा परिसर उजळून निघाला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळेच चैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
या मंगल प्रसंगी समूहाचे प्रमुख कार्यकर्ते मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड, संभाजी देशमुख, आशिष वाघ, सुनिल जोरे, प्रविण वाघ, संतोष मोजाड, शरद करंजकर, आशिष वाघ यांच्यासह भगूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करत दीपावलीची मंगलमय सुरुवात केली.