40 टन मका मुरघासासह चारा व्यवस्थापनाचा कारेगावच्या पशुपालकाचा आदर्श

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/10/2026 10:15 AM

नांदेड :- जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याचे शास्त्रोक्त नियोजन व साठवणूक करण्याचे महत्त्व वाढले आहे. लोहा तालुक्यातील कारेगाव येथील उपक्रमशील पशुपालक व प्रगतिशील शेतकरी सुधाकर किरवले पाटील यांनी सुमारे 40 टन मका मुरघासाची निर्मिती, सोयाबीन कुटाराचा साठा आणि वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी केलेले नियोजन इतर पशुपालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या चारा व्यवस्थापनाची पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या भेटीदरम्यान पशुधनाची सद्यस्थिती, उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, चारा साठवणुकीची व्यवस्था आणि संभाव्य टंचाईच्या काळातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला पुरेसा व पौष्टिक चारा उपलब्ध राहावा, यासाठी किरवले पाटील यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली.
किरवले पाटील यांनी जमिनीत खड्डा तयार करून सुमारे 40 टन मका मुरघासाची निर्मिती व साठवणूक केली आहे. याशिवाय पशुधनासाठी सोयाबीन कुटाराचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवला आहे. वर्षभर हिरवा चारा मिळावा, यासाठी सुपर नेपियर आणि मका पिकांची लागवड केली असून, चारा उत्पादनासाठी सिंचनाची सुविधाही उपलब्ध आहे. आगामी रब्बी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यासाठी त्यांनी अनुदानित चारा बियाणे मिळण्याबाबत अर्जही सादर केला आहे.
उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून चारा उत्पादन, संवर्धन आणि साठवणुकीचे केलेले हे नियोजन संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या वेळी परिसरातील शेतकरी व पशुपालकांना चारा साक्षरता अभियानांतर्गत मुरघास निर्मिती, सोयाबीन कुटाराचे संवर्धन, निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे, सुपर नेपियरची लागवड, रब्बी हंगामातील चारा उत्पादन तसेच उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व शास्त्रोक्त पद्धतीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील इतर पशुपालकांनीही सुधाकर किरवले पाटील यांच्या नियोजनाचा आदर्श घेऊन चारा उत्पादन व साठवणुकीसाठी पुढाकार घ्यावा आणि संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पूर्वतयारी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.
या पाहणीवेळी जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, सहाय्यक आयुक्त, नायगाव डॉ. गौतम खिल्लारे आणि पशुवैद्यकीय अधिकारी, सोनखेड डॉ. बालाजी जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या