नांदेडमध्ये ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ दिवाळी मेळ्याचे आयोजन;महिला व लघुउद्योजकांना उत्पादन विक्रीची संधी;सहभागी व्यावसायिकांना अमृत संस्थेचे प्रमाणपत्र

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/10/2026 8:50 AM

नांदेड :- स्थानिक व्यावसायिक, लघुउद्योजक आणि महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ या उपक्रमांतर्गत नांदेड येथे भव्य दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात MitrAAn Events & Management यांचे सहकार्य लाभणार आहे.
हा मेळा दि. 27, 28 व 29 ऑक्टोबर 2026 रोजी चैतन्य नगर येथील सौभद्र मंगल कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विविध उत्पादनांच्या प्रदर्शनासह विक्रीची संधी
या मेळ्याच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक, लघुउद्योजक, महिला उद्योजक तसेच घरगुती व हस्तकला उत्पादनांची निर्मिती करणाऱ्यांना आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करता येणार आहे. मेळ्यात कपडे, फॅशनविषयक वस्तू, दागिने, हस्तकला, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ आणि अन्य विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनाही एकाच ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी करणे, ग्राहकांशी थेट संपर्क वाढविणे आणि व्यवसायवृद्धीला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. मेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्टॉलधारकाला अमृत संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे.
मेळ्याची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमे, डिजिटल जाहिराती आणि विविध प्रसिद्धी माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.

*स्टॉल नोंदणी सुरू; इच्छुकांनी संपर्क साधावा*

या मेळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी स्टॉल नोंदणी सुरू असून, एका स्टॉलसाठी 2 हजार 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांनी स्टॉल आरक्षण व अधिक माहितीसाठी 7391065472, 8600240032 किंवा 9422874346 या क्रमांकांवर संपर्क साधावा. 
नांदेडमधील नागरिकांनी या दिवाळी मेळ्याला भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या