रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या १० ते १२ वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल
सांगली, दि. १५ ऑक्टोबर २०२६ :
सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. विशालदादा पाटील यांच्या शिफारशीनुसार नागरिक जागृती मंच, सांगली जिल्ह्याचे सतीश वसंतराव साखळकर यांची मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीवर (DRUCC) सदस्य म्हणून निवड झाली आहे.
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठविले आहे. सदर समितीचा कार्यकाळ १ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ असा दोन वर्षांचा आहे.
सतीश साखळकर यांनी गेल्या १० ते १२ वर्षांपासून नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हा तसेच रेल्वे प्रवासी ग्रुप, सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
सांगली, मिरजसह जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा विकास, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा, नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे, विविध गाड्यांना थांबे मिळविणे, रेल्वे वेळापत्रकातील सुधारणा आणि प्रवाशांच्या इतर अडचणींबाबत रेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय तसेच लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत असलेली तळमळ, प्रदीर्घ अनुभव आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवर खासदार विशालदादा पाटील यांनी साखळकर यांच्या नावाची शिफारस केली.
या निवडीबद्दल खासदार विशालदादा पाटील यांचे आभार व्यक्त करताना साखळकर म्हणाले की, "गेली अनेक वर्षे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्याला या निवडीमुळे एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे. सांगली, मिरजसह संपूर्ण पुणे रेल्वे विभागातील प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. रेल्वे प्रशासन आणि सामान्य प्रवासी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यास प्राधान्य देणार आहे."
सतीश वसंतराव साखळकर
सदस्य, पुणे विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती (DRUCC)
नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हा
रेल्वे प्रवासी ग्रुप, सांगली जिल्हा