भगूर आधार केंद्रात सुविधा ठप्प; नागरिक व विद्यार्थी त्रस्त, मनसे आक्रमक

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 15/10/2026 3:14 AM

भगूर आधार केंद्रात सुविधा ठप्प; नागरिक व विद्यार्थी त्रस्त, मनसे आक्रमक

​भगूर (ता. १५): भगूर येथील आधार कार्ड केंद्रात गेल्या काही दिवसांपासून नवीन आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्ड मधील दुरुस्ती व अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली आहे. यामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, भगूर येथील आधार केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव आणि सततचे तांत्रिक कारण सांगून नागरिकांना तासनतास रांगेत उभे ठेवल्यानंतर माघारी पाठवले जात आहे. सध्या शाळा प्रवेश, विविध शासकीय योजना आणि शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. मात्र, आधार केंद्र बंद असल्याने सकाळपासून रांगेत ताटकळत उभे राहूनही काम होत नसल्याने विद्यार्थी व पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

​मनसेचा प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा

​आधार केंद्रातील सावळागोधळ आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे शहराध्यक्ष श्री. सुमित चव्हाण व उपशहराध्यक्ष श्री. श्याम देशमुख यांनी आधार केंद्रावर जाऊन प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला आणि तात्काळ पूर्णवेळ कर्मचारी नेमून आधार सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.

​"प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नवीन आधार कार्ड व अपडेट सुविधा पूर्ववत सुरू करावी. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा थेट इशारा मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण व श्याम देशमुख यांनी दिला आहे.


​यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात संतोष सोनवणे, राजेश गायकवाड, विकास मोरे, स्वप्नील देशमुख, यश राजपूत, अभिषेक चव्हाण, हरीश देशमुख, अक्षय देशमुख, मयूर चव्हाण, हर्षल चव्हाण, शेखर अहिरे, सौरभ जाधव, वैभव गायकवाड आणि पवन चव्हाण आदींचा समावेश होता.

​आता तरी संबंधित प्रशासन खडबडून जागे होऊन भगूर येथील आधार सेवा तात्काळ सुरू करते की मनसेच्या आंदोलनाला सामोरे जाते, याकडे संपूर्ण भगूर शहराचे लक्ष लागले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या