नांदेड:-मालेगाव येथील कै.मुंजाजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा क्षेत्रात तालुका,जिल्हा,विभाग आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रीडा गौरव सोहळा १९ ऑक्टोंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. विविध क्रीडा प्रकारांत प्राविण्य मिळवणाऱ्या एकूण ८६ विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्रीहरी खुर्दामोजे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कै.मुंजाजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय पाटील इंगोले उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य अनुराधा कदम, पालक प्रतिनिधी शिवाजी इंगोले, वीरभद्र दंडे, नारायण अन्नपूर्वे, राजू चव्हाण, मल्लिकार्जुन जनकवाडे, आझादे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, धावणे, बॅडमिंटन, गोळाफेक, भालाफेक, कबड्डी, बुद्धिबळ आणि चालणे अशा विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशस्वी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
विभागस्तरीय भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेला विद्यार्थी शिवम शिवाजी इंगोले याचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवून विभागस्तरावर खेळण्याची संधी मिळवणाऱ्या विद्यार्थिनी अक्षरा अन्नपूर्वे हिचाही विशेष सत्कार करण्यात आला. या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत मानाची भर पडली आहे.विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन करून त्यांच्या यशात योगदान देणारे क्रीडा मार्गदर्शक प्रा. शुद्धोधन हटकर, उपप्राचार्य अनुराधा कदम, डॉ. विजयमाला ढोले, प्रा. सुदर्शन फाजगे आणि प्रा. नेहा अंडगे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे संजय पाटील इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रातील सातत्य, शिस्त, मेहनत आणि जिद्द यांचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालक प्रतिनिधी शिवाजी इंगोले आणि विद्यार्थी प्रतिनिधी मनीषा इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा मार्गदर्शक प्रा. शुद्धोधन हटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेसाब शेख यांनी केले, तर अध्यक्षीय समारोपा नंतर प्राचार्य श्रीहरी खुर्दामोजे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.