आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
२३ ऑक्टोबरला मतदान; शिक्षकांसाठी ४४ तर पदवीधरांसाठी १३ मतदान केंद्रे
सातारा : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४, तर पदवीधर मतदारसंघासाठी १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी राहणार आहे. मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ, मतदान केंद्रे, मतपेट्या आणि इतर निवडणूक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षक मतदारसंघात २३०, तर पदवीधर मतदारसंघात ४६५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतदारांची ओळख तपासणी, मतदानाची कार्यपद्धती आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत प्रशिक्षण व सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मतपेट्या, मतदार याद्या, मतदार नोंदवही, मतदानासाठी आवश्यक नमुने आणि इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान साहित्याचे वितरण आणि मतदानानंतर ते सुरक्षितपणे जमा करण्यासाठीही आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवरील कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि नियुक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदारांना नाव आणि मतदान केंद्र तपासण्याचे आवाहन
शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदानापूर्वी मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी. तसेच आपले मतदान केंद्र कोणते आहे, याची माहिती आधीच तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुविधेचा वापर करता येणार आहे.
मतदार नाव शोध संकेतस्थळ : https://mahaelection.gov.in/Citizen/Search
लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्वाचे स्थान असून, सर्व पात्र शिक्षक व पदवीधर मतदारांनी २३ ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.