नांदेड :- जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातही सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध असलेला मर्यादित जलसाठा अत्यंत काटकसरीने वापरून पुढील ऑगस्ट २०२७ पर्यंत संपूर्ण नांदेड शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे टाकले आहे. पाण्याचे हेच गंभीर संकट ओळखून नांदेड महानगरपालिका आता पूर्णपणे 'ॲक्शन मोड'वर आली असून, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत आयुक्तांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला, तसेच पाण्याचा पुनर्वापर, पाणी गळती रोखणे आणि जनजागृती करणे यांबाबत प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. बैठकीत पाणी पुरवठा विभागाने मागील आठवड्याभरात केलेल्या कारवाईची आकडेवारी सादर केली. यामध्ये शहरातील अवैध पाणी वापर रोखण्यासाठी मागील आठवड्यात १०९ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तातडीने ११४ ठिकाणी गळती दुरुस्ती करण्यात आली असुन सार्वजनिक व इतर ठिकाणी पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी २१ नवीन तोट्या बसविण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करण्यासाठी मनपाने प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने पालिकेच्या डंकीन येथील मलशुद्धीकरण केंद्रात दररोज १० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते. यापैकी सद्यस्थितीला २ एमएलडी पाणी हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार शहरातील बांधकामे, उद्याने व इतर स्वच्छता विषयक कामांसाठी पुनर्वापरात आणले जाणार आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात शहरातील अस्तित्वात असलेल्या विविध ५ ठिकाणच्या कॉम्पॅक्ट मलशुद्धीकरण केंद्रांमधूनही सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुनर्वापरासाठी वापरात आणले जाईल, ज्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होईल.
नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत असणाऱ्या तक्रारींची त्वरित दखल घेण्यासाठी महानगरपालिकेतर्फे लवकरच एक विशेष टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या क्रमांकावर नागरिक पाणी गळती, अनधिकृत नळ जोडणी किंवा पाणी टंचाई संदर्भातील तक्रारी थेट नोंदवू शकतील. यासोबतच शहरात पाण्याच्या काटकसरीबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील अस्वामित्व (मालकी हक्क नसलेल्या) आणि अनधिकृत नळांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील अनुसूची 'ड' मधील प्रकरण १० अन्वये नवीन नळ जोडणी करारनामा, कायदेशीर कारवाई व पालिकेस असलेल्या कायदेशीर अधिकारानुसार अनधिकृत पाणी वापरणाऱ्यांवर थेट फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
*चौकट*
*आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन:*
"सध्याचे पाण्याचे संकट गंभीर असून ऑगस्ट २०२७ पर्यंत शहराला पाणी पुरवायचे आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलत आहोत. परंतु, नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा पुनर्वापर करावा आणि पाण्याचा थेंब अन् थेंब काटकसरीने वापरावा," असे आवाहन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केले आहे.
या बैठकीला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, सहा.संचालक नगरचना ओम लहाणे, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, उपअभियंता नरेंद्र सुजलेगांवकर, कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते, किरण सुर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे आदी उपस्थित होते.